(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सार्वजनिक रस्ते, महामार्ग, बसस्थानक परिसर आणि प्रमुख मार्गांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना आता पोलिसांनी थेट कायद्याचा दणका देण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या कारवाईत एकूण ४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुचाकीपासून ट्रक, डंपर, ट्रेलर आणि बसपर्यंत विविध वाहनांवर कारवाई झाल्याने रस्त्यावर मनमानी पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांच्या कारवाईत खेड, चिपळूण, सावर्डे, लांजा, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, देवरुख, दापोली, संगमेश्वर आणि कुंभार्ली घाट परिसरातील वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणे, हा प्रकार केवळ वाहतुकीची कोंडी करणारा नसून अपघाताला निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. खेड-दापोली मार्गावर दुचाकी उभी केल्याप्रकरणी अमोल अशोक शेलार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भरणे ब्रिजखाली टाटा टियागो आणि सुझुकी ईकोसह वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुषार नानाजी कदम, सुहास बाबाजी जाधव, अमर शंकर मोरे आणि नितेश धोंडू हंबीर यांच्यावर कारवाई झाली.
खेड रेल्वे स्थानक मार्गावर ईको वाहन उभे करणाऱ्या बशीर अहमद आदम चौगले, तसेच तिनबत्ती नाका परिसरात वाहने उभी करणाऱ्या सौरभ दत्ताराम चिंचघरे आणि मैनुद्दीन अब्दुल गफूर तांबे यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले. चिपळूणमधील पॉवर हाऊस ते चिंचनाका मार्गावरील किंग सुपर बाजारासमोर मिडी बस उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नितीश विष्णू बोबले याच्यावर गुन्हा दाखल झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे परिसरात ट्रक उभा करणाऱ्या संदीप अनंत पावसकर याच्यावरही कारवाई करण्यात आली. कुंभार्ली घाटात तर अवजड वाहनांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतुकीला अडथळा ठरणारे ट्रेलर आणि ट्रक रस्त्यावर उभे केल्याप्रकरणी गुरुसाहेब बलवीर सिंग, चरणजीत संतोष सिंग आणि सैद अहमद मोहम्मद शमीम यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. लांजा बाजारपेठ तसेच मुंबई-गोवा महामार्ग परिसरातही पोलिसांनी कारवाई केली. पॅशन प्रो, वॅगनर, छोटा हत्ती, स्प्लेंडर प्लस आणि सफारी यांसारखी वाहने रस्त्यावर उभी करणाऱ्या अमोल राजाराम गुरव, आदिल रमेश गोसावी, राजेश रमेश भाटवडेकर, पवनकुमार भिमू राठोड आणि महेश मधुकर मोहिते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले.
राजापूर शहरात युनियन बँकेसमोर ओमनी वाहन उभे करणाऱ्या आनंद नामदेव कोळेकर याच्यावर, तर ताबरेज चौकातील गणेशनगर बसथांब्याजवळ मालवाहू वाहने उभी करणाऱ्या प्रविण महादेव नाईक, नजाक सफरराज हुना आणि सरुद्दीन फकीर अहमद हुना यांच्यावर कारवाई करण्यात आली. राजापूर एसटी डेपोजवळ विनानंबर अॅक्सेस स्कूटर भरधाव वेगाने चालविल्याप्रकरणी सुजित रमेश शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहितेसह मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहर व परिसरातही पोलिसांनी बेशिस्त पार्किंगविरोधात मोहीम राबविली. कांचन हॉटेल ते बाफना मोटर्स मार्गावरील प्रगती टाईल्स अँड मार्बलसमोर ट्रक उभा करणाऱ्या गोपाळ कुमार महतो याच्यावर कारवाई झाली. कारवांचीवाडी फाटा ते कुवारंबाव मार्गावर रिक्षा उभी करणाऱ्या अमोल विजय चव्हाण आणि कुवारंबाव ते कारवांचीवाडी मार्गावर डंपर उभा करणाऱ्या मोहम्मद जमाल अकबर अन्सारी यांच्याविरोधातही गुन्हे दाखल झाले. रहाटाघर ते जयस्तंभ मार्गावर इर्टिगा उभी करणाऱ्या सन्मान जगदीश पेंडणेकर याच्यावरही कारवाई करण्यात आली.
दापोली बसस्थानक परिसर पोलिसांच्या निशाण्यावर
दापोली शहरातील बसस्थानकासमोरील मुख्य मार्गावर रिक्षा, कार आणि अन्य वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर सलग कारवाई करण्यात आली. रफिक युसूफ मुजावर, राजेंद्र हरिश्चंद्र पवार, योगेश बळीराम गायकवाड, महेंद्र महादेव दवंडे, यशवंत बापू कांबळे आणि कल्याण कृष्णा मिसाळ यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. सावर्डे-वहाळ फाटा परिसरात प्रवासी बोलेरो रस्त्यावर उभी केल्याप्रकरणी शेखर शिवाजी भागडे, तर गुहागर-चिपळूण मार्गावरील शृंगारतळी पोलिस चौकीसमोर मॅक्सिमो वाहन उभे करणाऱ्या वैभव प्रविण मांडवकर याच्यावर कारवाई करण्यात आली.
देवरुख, संगमेश्वर, पुणगड-पावसगडही कारवाईच्या कक्षेत
देवरुख कोंडगाव-साखरपा एसटी स्टँडबाहेर टाटा सुमो उभी करणाऱ्या सुदेश रघुनाथ सुर्वे याच्यावर, तर संगमेश्वर एसटी स्टँडसमोर अल्टो कार उभी करणाऱ्या अमित श्रीपाद सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पुणगड-पावसगड परिसरात सार्वजनिक रस्त्यावर टाटा सुमो वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अन्वर अहमद फजलानी, मुकेश प्रमोद साखरकर आणि किरीट गणपत आडिवरेकर यांच्याविरोधातही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
रस्त्यावर पार्किंग की अपघाताला निमंत्रण?
महामार्ग, घाटमार्ग, बाजारपेठा आणि बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला अथवा मुख्य मार्गावर बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने वाहतुकीची कोंडी होण्यासोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वळणाच्या ठिकाणी उभी असलेली अवजड वाहने इतर वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास गंभीर अपघाताची शक्यता असते. या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांच्या या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.

