(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आबलोली ते जाकादेवी मार्गावर मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पिता-पुत्र जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला. या प्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश अनंत चव्हाण (वय १८, रा. राई रांजेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी क्रमांक एमएच ४६ बीजी ८१४९ वरून वडील अनंत तुकाराम चव्हाण (वय ६०) आणि आई रुपाली अनंत चव्हाण (वय ५६) यांना घेऊन राई येथून काजुर्लीच्या दिशेने जात होता. दुचाकी आबलोली-जाकादेवी मार्गावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे आली असता समोरून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ९८७० ने दुचाकीला धडक दिली. बसचालकाने बस हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या उजव्या बाजूला येत दुचाकीला धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या अपघातात दुचाकी चालक विघ्नेश चव्हाण आणि मागे बसलेले अनंत चव्हाण हे दोघेही जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी प्रमोद अशोक जगताप (वय ४३, व्यवसाय शेती, रा. काजुर्ली मळेवाडी, ता. गुहागर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून एसटी बसचालक पुंडलीक शिवाजी केंद्रे (वय ३५, रा. केंद्रेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर; सध्या रा. कारवांचीवाडी, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अपघाताची नोंद २८ ऑगस्ट रोजी रात्री ८.५२ वाजता करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

