(चिपळूण / रत्नागिरी)
घरफोडी करून चोरी केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत तपासाची चक्रे फिरवत चिपळूण पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. मार्गताम्हाणे येथील गोपाळवाडी परिसरात घडलेल्या या घरफोडीप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला तब्बल ४ लाख ४५ हजार ८४२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिपळूण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपासाला सुरुवात केली. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील हालचाली, उपलब्ध माहिती तसेच तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास सुरू केला. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्याची दिशा निश्चित केली.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेला ४ लाख ४५ हजार ८४२ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली. घरफोडीची माहिती मिळताच तातडीने तपासाची दिशा निश्चित करून अवघ्या दोन तासांत आरोपीपर्यंत पोहोचल्याने चिपळूण पोलिसांच्या तपासातील तत्परतेचे कौतुक होत आहे.
दोन तासांत तपासाचा छडा
घरफोडीनंतर नेहमीप्रमाणे कागदोपत्री तपासापुरते मर्यादित न राहता पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर केला. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्याचा वेगाने उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

