(रायगड / नागोठणे)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बुधवार (२६ ऑगस्ट) रोजी माजी खासदार विनायक राऊत यांच्या समवेत त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी नागोठणे येथील हॉटेल कामत परिसरातील रस्ता आणि उड्डाणपुलाची पाहणी करताना त्यांनी महामार्गाच्या कामावरून सरकारला जाब विचारला.
नागोठणे येथील पाहणीदरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी महामार्ग तसेच उड्डाणपुलाच्या कामाबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी रस्त्याची झालेली दुरवस्था, उड्डाणपुलावर पडलेले तडे, पुलाच्या बाहेरील बाजूला करण्यात आलेले निकृष्ट बांधकाम आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत हा पूल भविष्यात कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी पूर्णपणे पाडून नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उड्डाणपुलाच्या कामावरून आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, स्थानिकांकडून तक्रारी आल्यानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतरही पुलाच्या कामाची स्थिती पाहता बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. पुलाखालील रस्त्याचीही दयनीय अवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारला लक्ष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. काही ठरावीक मंत्री महामार्गाची पाहणी करण्यासाठी येतात. त्यानंतर संबंधित विभागाकडून डागडुजी केली जाते; मात्र काही काळानंतर रस्त्याची परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. स्थानिक राजकारणावरही आदित्य ठाकरे यांनी टीका केली. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पालकमंत्रीपद, बंगला आणि गाडी यावरून वाद सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी महामार्गाच्या प्रश्नावर मात्र कोणीही ठोस आवाज उठवत नसल्याचे म्हटले.
दरम्यान, महामार्गालगत पालकमंत्री झाल्याबाबतचे मोठमोठे बॅनर लावण्यात आल्याचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी सरकारला उपरोधिक सवाल केला. “ए-१ क्वालिटीच्या बॅनरसारखाच मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पेव्हरब्लॉकच्या कामावरून दोन मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या कथित संभ्रमाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे यांनी हा वाद दोन मंत्र्यांमधील नसून कंत्राटदारांमधील असल्याचा टोला लगावला.
या पाहणी दौऱ्यात माजी खासदार विनायक राऊत, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महिला जिल्हा उपसंघटिका दर्शना जवके, रोहा उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, नागोठणे विभागप्रमुख प्रकाश मेस्त्री यांच्यासह नागोठणे शहर आणि परिसरातील नागरिक, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीदरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीला भेट देत स्थानिक रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या स्थितीची पाहणी केली. यावेळी लोटे एमआयडीसीतील एका मोठ्या खड्ड्याची पाहणी केल्यानंतर घडलेल्या प्रकाराची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.
आदित्य ठाकरे यांनी लोटे एमआयडीसी परिसरातील आवाशी-गुणदे मध्यवर्ती शाखेसमोरील रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता. ठाकरे यांनी या खड्ड्याची पाहणी केल्यानंतर ते पुढील बैठकीसाठी रवाना झाले. मात्र, त्यांची बैठक संपून ते परत येण्यापूर्वीच प्रशासकीय यंत्रणेने या खड्ड्याची तातडीने दखल घेत डागडुजी केली.
आदित्य ठाकरे यांनी लोटे एमआयडीसीतील उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. लोटे एमआयडीसीतील रस्ते आणि मूलभूत सुविधा अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यामुळे काही उद्योग बाहेर जाण्याच्या स्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे लोटे एमआयडीसीतील रस्त्यांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा राजकीय रंग आला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या खड्ड्याची त्यांच्या पाहणीनंतर तातडीने डागडुजी झाल्याने स्थानिकांमध्येही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे आणि कोकणातील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

