(नांदेड / वृत्तसंस्था)
सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांची बिले रखडल्यामुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावातून नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील कंत्राटदार गजानन देवकते यांनी मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका कार्यकारी अभियंत्याला लिहिलेल्या पत्रातून कंत्राटदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी आणि कामांची बिले मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ याबाबत व्यथा मांडली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या प्रश्नांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन देवकते हे मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित कंत्राटी कामे करत होते. या कामांमध्ये त्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कामे पूर्ण करूनही बिले वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
कंत्राटी कामांसाठी देवकते यांनी व्याजाने पैसे घेतले होते. तसेच पत्नी आणि आईचे दागिने गहाण ठेवूनही कामांमध्ये पैसे गुंतवले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र कामांची बिले रखडल्याने आर्थिक अडचणी वाढत गेल्या. बिल काढण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही त्यांच्या पत्नीने केला आहे. या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असून, संबंधित अधिकाऱ्याची भूमिका आणि आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
गजानन देवकते यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि वृद्ध आई असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, आज मुखेड येथे गजानन देवकते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आत्महत्येपूर्वी गजानन देवकते यांनी कार्यकारी अभियंता विद्याधर पाटस्कर यांना पत्र लिहिले होते. ‘आम्ही जगावे कसे आणि करावे काय?’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या पत्रातून सार्वजनिक बांधकाम विभागातील लहान कंत्राटदारांच्या अडचणी मांडल्या आहेत.
पत्रात देवकते यांनी आपण सार्वजनिक बांधकाम विभागातील एक छोटे कंत्राटदार असून, मिळेल ती कामे करून आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे नमूद केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
लहान कंत्राटदारांना काम मिळवण्यासाठी अनेकदा अभियंत्यांकडे जावे लागते. काम मिळाल्यानंतर ते पूर्ण करूनही देयके मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, अशी व्यथा त्यांनी पत्रातून व्यक्त केली. शासनाकडून निधी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात कंत्राटदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली.
‘पैशापुढे कुणालाच काही दिसत नाही, त्यामुळे मला जगावे कसे आणि करावे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे,’ अशा आशयाची व्यथा त्यांनी पत्रातून मांडली आहे. कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ येऊ नये आणि त्यांना सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती.
या पत्रामुळे गजानन देवकते यांच्या मृत्यूपूर्वीच्या आर्थिक आणि मानसिक परिस्थितीवर प्रकाश पडला आहे. मात्र त्यांनी केलेले आरोप आणि कुटुंबीयांनी केलेल्या लाच मागणीच्या आरोपांची संबंधित यंत्रणेकडून अधिकृत चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

