(जाकादेवी / वार्ताहर)
खालगाव येथील हनुमान मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘एक होतं गाव’ या नाट्यप्रयोगाला गावकऱ्यांसह परिसरातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री देव हनुमान मंडळ, खालगाव (मधली गोताड वाडी, ता. जि. रत्नागिरी) यांच्या वतीने हनुमान जयंतीच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या दोन अंकी सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
लेखक व दिग्दर्शक सचिन शितप यांच्या प्रभावी लेखणीतून साकारलेले ‘एक होतं गाव’ हे नाटक गावातील संघर्ष, तरुणांची जिद्द आणि विकासाची ओढ यांचे वास्तवदर्शी चित्रण करते. या नाटकाने जाकादेवी पंचक्रोशीतील हजारो प्रेक्षकांची मने जिंकली.
नाटकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, हे नाटक केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या ध्येयवादी तरुणांची प्रेरणादायी कहाणी सादर करते. गावातील राजकारण, समाजकारण आणि त्यातून प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या तरुणांचा संघर्ष हा या नाटकाचा गाभा आहे.
कलाकारांच्या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षक भारावून गेले. गावाच्या विकासासाठी लढणाऱ्या तरुणांच्या संघर्षपूर्ण प्रवासाने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले. तसेच वैयक्तिक स्वार्थापेक्षा गावाचे हित अधिक महत्त्वाचे आहे, हा प्रभावी सामाजिक संदेश नाटकातून देण्यात आला.
या नाट्यप्रयोगाने जाकादेवी पंचक्रोशीतील प्रेक्षकांची अभूतपूर्व गर्दी खेचत प्रतिसादाचे सर्व विक्रम मोडीत काढले. “हे नाटक म्हणजे केवळ रंगमंचावरील सादरीकरण नसून गावागावांतील वास्तवाचे जिवंत दर्शन आहे. प्रत्येक तरुणाने पाहावे असे हे नाटक आहे,” अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.

