(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक अडचणींची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली असून, जुलै महिन्यात राज्यातील अनेक एसटी विभागांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या आर्थिक फटक्यात रत्नागिरी विभाग ९.३२ कोटी रुपयांच्या तोट्यासह राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एकीकडे एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान असताना दुसरीकडे प्रवाशांना दर्जेदार आणि वेळेत सेवा देण्याचेही मोठे आव्हान रत्नागिरी विभागासमोर उभे ठाकले आहे.
जुलै महिन्यातील विभागनिहाय तोट्याचा विचार करता नाशिक विभागाला १३.८४ कोटी रुपये, कोल्हापूर विभागाला १३.७ कोटी रुपये, रत्नागिरी विभागाला ९.३२ कोटी रुपये, सातारा विभागाला ८.३२ कोटी रुपये, तर सांगली विभागाला ८.२३ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या आकडेवारीमुळे एसटीच्या आर्थिक स्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. रत्नागिरी विभागात मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस कालबाह्य होऊन भंगारात गेल्या आहेत. काही नवीन बसेस विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या असल्या तरी प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध बसगाड्यांची संख्या अद्याप अपुरी असल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक मार्गांवर नियमित फेऱ्या चालविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यातच चालक, वाहक तसेच यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. मनुष्यबळाअभावी उपलब्ध बसेसचेही योग्य नियोजन करणे कठीण होत असून, त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे.
बस वेळेवर न सुटणे, नियोजित वेळेत बस स्थानकावर किंवा थांब्यावर न पोहोचणे, जुन्या बसगाड्यांची दुरवस्था आणि काही मार्गांवरील अपुऱ्या फेऱ्या यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. रोजच्या प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सेवेतील या अनिश्चिततेमुळे काही प्रवाशांनी आता वडाप, मिनीबस आणि खासगी चारचाकी वाहनांचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. परिणामी एसटीचे प्रवासी कमी होणे आणि त्यातून उत्पन्नावर परिणाम होणे, असे दुष्टचक्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण सेवेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
रत्नागिरी विभागाला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केवळ महसूल वाढविण्यापेक्षा प्रवाशांचा विश्वास पुन्हा संपादन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी शहरी बससेवेची जबाबदारी संबंधित नगरपरिषदांकडे वर्ग करून एसटीने ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील महत्त्वाच्या मार्गांवर नवीन बसेस उपलब्ध करून देणे, चालक-वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करणे, तसेच ई-बसेसच्या माध्यमातून ताफ्याचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. ज्या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्या मार्गांवर मागणीनुसार जादा फेऱ्या सुरू केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते.
वेळेचे नियोजन आणि तक्रार निवारणावर भर आवश्यक
एसटीची सेवा ही केवळ वाहतुकीचे साधन नसून ग्रामीण भागाच्या दैनंदिन जीवनवाहिनीचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण, बसफेऱ्यांचे काटेकोर नियोजन आणि ठरलेल्या वेळेत बस थांब्यावर उपलब्ध होण्याची हमी याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवीन बसेस, पुरेसे मनुष्यबळ, मार्गांचे शास्त्रशुद्ध नियोजन आणि प्रवाशांच्या गरजेनुसार बसफेऱ्यांची संख्या वाढविल्यास रत्नागिरी विभागाचा तोटा टप्प्याटप्प्याने कमी करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या उपायांपेक्षा दीर्घकालीन आणि परिणामकारक नियोजनाची दिशा स्वीकारणे गरजेचे आहे. रत्नागिरी विभागाच्या आर्थिक तोट्याची ही आकडेवारी केवळ आर्थिक प्रश्न नसून, एसटीच्या सेवेचा दर्जा आणि प्रवाशांचा बदलता कल यांचाही आरसा आहे. त्यामुळे ‘तोट्याचा प्रवास’ थांबवून एसटीला पुन्हा प्रवाशांच्या विश्वासाच्या मार्गावर आणण्याचे मोठे आव्हान महामंडळासमोर आहे.

