(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या चर्मालय चौकात सध्या वाहतूक सुरळीत ठेवताना वाहतूक पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे चौकातील वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाले असून, चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांमुळे वाहनचालकांचा ताळमेळच बिघडताना दिसत आहे. परिणामी हा चौक सध्या ‘अपघाताचा चौक’ बनण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या कामाच्या पद्धतीवर वाहनचालक आणि स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. चर्मालय चौकातील अंतिम प्रकल्प आराखडा नेमका कसा असणार, याची माहिती सर्वसामान्यांना नसली तरी चौकाच्या दोन्ही बाजूंना काँक्रिटच्या मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी वाहतुकीचा सर्वाधिक ताण आहे, त्याच चौकाचा भाग अर्धवट अवस्थेत राहिल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चर्मालय चौकात चारही बाजूंनी वाहने येत असल्याने प्रत्येक वाहनचालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज घेत पुढे सरकावे लागत आहे. रस्त्याची रचना, मार्गिकांची अपूर्णता आणि चौकातील खडी-खड्डे यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी येथील परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. चौकात ठिकठिकाणी खड्डे आणि पसरलेली खडी असल्याने वाहन घसरण्याची शक्यता आहे. वाहतूक वाढली की वाहनचालकांची घाई आणि गोंधळ वाढतो आणि त्यातून अपघाताचा धोका निर्माण होत आहे. महामार्गाच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येचा भार मात्र वाहतूक पोलिसांना उचलावा लागत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून नियोजन करताना दिसतात. ठेकेदाराने कामाच्या नियोजनात दाखवलेली ढिलाई भरून काढण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे. अडचणींच्या या परिस्थितीतही वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे योग्य नियोजन करून कोंडी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामाचे कौतुक होत असतानाच महामार्गाच्या कामाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने आणि ठेकेदाराने रस्त्याची अवस्था काय करून ठेवली आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
चौक सोडून दोन्ही बाजूंची काँक्रिटची धावपळ कशासाठी?
महामार्गाचा प्रकल्प नेमक्या कोणत्या आराखड्यानुसार सुरू आहे, याबाबत नागरिकांना पूर्ण माहिती नसली तरी प्रत्यक्षात चौकाचा महत्त्वाचा भाग अपूर्ण ठेवून दोन्ही बाजूंना काँक्रिटच्या मार्गिका उभारण्यात आल्याने कामाच्या क्रमाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतुकीचा सर्वाधिक दबाव असलेल्या चौकाचे काम आधी पूर्ण करायचे की दोन्ही बाजूंना काँक्रिट मार्गिका तयार करून चौकाला खड्डे-खडीच्या हवाली करायचे? असा सवाल आता वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गाचे काम विकासासाठी असले तरी विकासाच्या नावाखाली नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागू नये, एवढीच अपेक्षा नागरिकांसह वाहनचालक व्यक्त करत आहेत. त्यामुळे चर्मालय चौकातील काम तातडीने, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांसह पूर्ण करून वाहतुकीला सुटसुटीत मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

