(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने प्रशासनाच्या आदेशालाच धाब्यावर बसविल्याचा प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. हद्दपारीचा आदेश प्राप्त होऊनही आरोपी रत्नागिरीतच आढळून आल्याने त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमिर नजिर मुजावर (वय ४०, रा. घर क्रमांक १३८५, राजिवडा नाका, रत्नागिरी) याच्याविरुद्ध मा. उपविभागीय दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(अ) अन्वये कारवाई केली होती. त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश १४ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आले होते. हद्दपारीचा आदेश प्राप्त झालेला असतानाही संबंधित आरोपीने आदेशाचे पालन केले नाही. उलट २४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता तो रत्नागिरी शहरातील डॉ. भोळे हॉस्पिटलसमोरील आठवडा बाजार परिसरात रस्त्यावर आढळून आला. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत पोलीस हवालदार दिपराज प्रकाश पाटील (बक्कल क्रमांक १४०७) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अमिर मुजावर याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २८८/२०२६ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १४१ आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी पहाटे १.५६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हद्दपारीसारख्या प्रतिबंधात्मक आदेशानंतरही आरोपी जिल्ह्यात आढळून आल्याने पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

