(रत्नागिरी / वार्ताहर)
गुरव ज्ञाती समाज संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन १२ एप्रिल २०२६ रोजी वाशी येथील गुरव ज्ञाती भवनात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. समाजातील सभासद आणि ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष श्री. गणपत लाड, श्री. विलास दत्ताराम गुरव, प्रमुख कार्यवाह श्री. राजेंद्र गुरव, सहकार्यवाह श्री. विलास गुरव, श्री. किशोर गुरव, खजिनदार श्री. सुभाष चव्हाण, अंतर्गत हिशोब तपासणी समितीचे श्री. रघुनाथ गुरव, दलप्रमुख दत्तराम गुरव तसेच विवाह समितीचे सदस्य व विश्वस्त यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्री सत्यनारायणाची पूजा पार पडली. या प्रसंगी ‘श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ, धोपेश्वर’ यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय केले. महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लकी ड्रॉद्वारे दोन भाग्यवान महिलांना सौ. रेश्मा गुरव, सौ. सुजाता पवार आणि अश्विनी चव्हाण यांच्या हस्ते पैठणी साड्या प्रदान करण्यात आल्या.सत्यनारायण पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते ‘श्री आई जाखादेवी नमन मंडळ, भालावली (ता. राजापूर)’ यांचे पारंपरिक नमन सादरीकरण. या लोककलेने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. रवींद्र नरोटे यांचा संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. राजेंद्र गुरव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच नमन मंडळाचे सूत्रधार श्री. विश्वास गुरव यांचा सत्कार सहकार्यवाह श्री. किशोर गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. गुरव ज्ञाती रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष श्री. मंगेश गुरव यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
या स्नेहसंमेलनासाठी अनंत केटरर्सचे श्री. नागेश वंजारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल संस्थेने विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे उपाध्यक्ष श्री. गणपत लाड यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

