(संगमेश्वर /प्रतिनिधी)
रस्त्यावरून धावणाऱ्या एसटी बसवर अचानक जिवंत विद्युतवाहिनी कोसळल्याने बुधवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यात अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर रामदास मिसळ स्टॉलजवळ ही दुर्घटना घडली. विद्युतवाहिनी बसवर पडताच वाहकाला विजेचा जोरदार धक्का बसला, तर चालक प्रसंगावधान राखल्याने थोडक्यात बचावला. बसमध्ये एकच प्रवासी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
आज सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. चालक रवींद्र साप्ते हे सकाळी सात वाजता संगमेश्वर बसस्थानकातून एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची उमरे एसटी घेऊन निघाले होते. बस उमरे फाट्यावर पोहोचली असता रामदास मिसळ स्टॉलजवळील विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण तुटल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर विद्युतप्रवाह सुरू असलेली वाहिनी थेट धावत्या एसटी बसवर येऊन कोसळली. विद्युतवाहिनी बसवर पडताच वाहक प्राजक्ता शिगवण यांना जोरदार विजेचा धक्का बसला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत सीटचा आधार घेतला. त्याचवेळी विद्युतप्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली.
चालक रवींद्र साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत असल्याने विद्युतवाहिनीच्या थेट संपर्कात येण्यापासून बचावले. त्यामुळे त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. बसमध्ये त्यावेळी केवळ एकच प्रवासी होता. तो सीटला टेकून बसला होता आणि पायात चप्पल असल्याने त्याला विजेचा धक्का जाणवला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असती तर या घटनेने किती मोठे संकट ओढवले असते, याचा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. एका धावत्या एसटीवर जिवंत विद्युतवाहिनी कोसळणे ही केवळ दुर्घटना नसून रस्त्यालगतच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळविले. त्यानंतर लाईनमन होडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्युतवाहिनी हटवून मार्ग सुरक्षित केल्याचे समजते.
जीर्ण यंत्रणेला ‘अपघात’ होण्याची वाट का?
संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांत जीर्ण विद्युत खांब, तारा आणि वाहिन्यांची अवस्था चिंताजनक असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यालगत असलेल्या विद्युत यंत्रणेची नियमित पाहणी आणि देखभाल कितपत केली जाते, हा प्रश्न या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. आज एका एसटी बसवर विद्युतवाहिनी कोसळली आणि सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उद्या अशीच वाहिनी गर्दीच्या रस्त्यावर, शाळेच्या बसवर किंवा प्रवाशांनी भरलेल्या वाहनावर कोसळल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता जीर्ण विद्युत खांब, तारा, सपोर्ट आणि रस्त्यालगतच्या धोकादायक वाहिन्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. फणसवणे येथील घटनेने महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेला धोक्याची घंटा दिली असून, आता तरी संबंधित विभागाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.

