(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेवस-रेड्डी सागरी महामार्ग क्र. ४ पासून पूर्णगड बौध्द वाडीपर्यंत जाणाऱ्या सुमारे ११०० ते १२०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. १९९१-९२ मध्ये तयार झालेल्या या रस्त्याचे फक्त ६०० मीटर लांबीचे डांबरीकरण यापूर्वीच झाले होते, मात्र उर्वरित ६२५ मीटर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता. परिणामी नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
समस्येला वाचा फोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी “रत्नागिरी 24 न्यूज’च्या माध्यमातून या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. छायाचित्रांसह प्रसिद्ध झालेल्या या बातमीने जनतेच्या भावना आणि संताप स्पष्टपणे मांडला. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध, महिलांना होणाऱ्या अडचणींची ठळक नोंद या बातमीत करण्यात आली होती. स्थानिक समस्या लक्षात घेऊन पूर्णगड बौद्धजन उत्कर्ष मंडळ ग्रामीण यांच्यातर्फे सतत पाठपुरावा करण्यात आला. विविध सरकारी विभागांशी पत्रव्यवहार करत या कामासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. अखेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४, रत्नागिरी यांच्या मार्फत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय कामांमध्ये सदर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाची योजना मंजूर झाली. हे काम पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आले.
दिनांक ११ मे २०२५ रोजी या रस्त्याचे ६२५ मीटर लांबीचे डांबरीकरण पूर्ण झाले. या कामासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश यशवंत पवार, सचिव नितीन गणू पवार आणि अन्य कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच वाडीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय दाजी पवार यांनी मुंबईहून खास गावी येत शासन दरबारी पाठपुरावा करून हे काम मार्गी लावण्यात मोलाचे योगदान दिले.
माध्यमांचा प्रभाव, स्थानिक संघटनांचा सातत्याने पाठपुरावा व सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न यामुळे अखेर हा रस्ता डांबरीकरणाच्या दिशेने सरकला आणि ११ मे २०२५ रोजी हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर “रत्नागिरी 24 न्यूज” या स्थानिक पत्रकारितेचे आणि त्यांच्या जनतेसाठीच्या सजगतेचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने बौध्दवाडी परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

