(दापोली / वार्ताहर)
प्रवाशांची वाहतूक करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. दापोलीतील फणस नाका येथे एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करून कटर ब्लेड दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना २० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत सतीश दत्ताराम शिगवण (३६, रा. मगीज मांडवकरवाडी, दापोली) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिगवण हे २० ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईहून आपल्या टेम्पो ट्रॅव्हल्समधून प्रवाशांना घेऊन दापोलीत आले होते. प्रवाशांना उतरवल्यानंतर विश्रांतीसाठी ते उमरवरे येथील मित्र प्रभाकर वानकर यांच्या घरी निघाले होते. दरम्यान, सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास ते फणस नाका येथे पोहोचले. त्यांनी रस्त्याच्या कडेला आपले टेम्पो ट्रॅव्हल्स वाहन उभे केले. त्याचवेळी तेथे आलेल्या रवी किरण उके (रा. फणस, दापोली) याने वाहन उभे करण्यावरून त्यांच्याशी वाद घातला. “या ठिकाणी गाडीत प्रवासी भरायचे नाहीत आणि वाकवली गावाच्या पुढे तू यायचे नाही,” असे म्हणत त्याने शिगवण यांना जाब विचारला.
या वादात शिगवण यांनी “तू उगाच माझ्याशी भांडू नको,” असे म्हटल्याने आरोपी संतापला. त्यानंतर त्याने हातातील बांबूने शिगवण यांच्या दोन्ही पायांवर, कंबरेवर, मांडीवर, पोटरीवर, दोन्ही हातांवर तसेच डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही. आरोपीने शिवीगाळ करत हातातील कटर ब्लेड अंगावर घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११७(२), ३५१(२), ३५२ आणि १३१ (जुन्या कलमानुसार ३२४, ५०६, ५०४, ३५२) अन्वये रवी किरण उके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

