( मुंबई / वृत्तसंस्था )
राज्यातील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी राज्य सरकारने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशन आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, ‘व्हिजन फॉर ऑल’ या उपक्रमांतर्गत राज्यभरातील तब्बल २० लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे. तपासणीत दृष्टिदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना १ लाख मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘व्हिजन फॉर ऑल’ हा शालेय नेत्र आरोग्य कार्यक्रम ऑगस्ट २०२६ ते जून २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये नेत्र तपासणी केली जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण करारावर मुंबईतील सह्याद्री स्टेट गेस्ट हाऊस येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादा भुसे, वरिष्ठ शासकीय अधिकारी, वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशनचे संचालक तथा एसिलोरलक्सोटिका ग्रेटर इंडियाचे अध्यक्ष वेणुअंबाती आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता उपस्थित होते.
शिक्षकांना प्रशिक्षण, शाळांमध्ये नेत्र तपासणी
या भागीदारीअंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून राज्यभरातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच शाळांमध्ये होणाऱ्या नेत्र तपासणी उपक्रमाचे समन्वयन विभागाकडून केले जाणार आहे.
रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट या उपक्रमाचा अंमलबजावणी भागीदार म्हणून काम पाहणार आहे. ट्रस्टकडून पात्र नेत्रचिकित्सा पथके नियुक्त केली जातील. ही पथके विद्यार्थ्यांची अपवर्तन तपासणी करून दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करतील. पात्र विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्याचे कामही समन्वयाने केले जाणार आहे.
वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशनकडून या उपक्रमाला तांत्रिक सहकार्य आणि नेत्र आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञता उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच अपवर्तन दोष आढळलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ लाख मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
२०१९ पासून सुरू असलेल्या उपक्रमाचा विस्तार
ही नूतनीकृत भागीदारी २०१९ पासून सुरू असलेल्या शालेय नेत्र आरोग्य उपक्रमाचा पुढील टप्पा आहे. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमधील ८०० शाळांतील ६.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ६३ हजारांहून अधिक चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे.
दृष्टिदोष वेळेत ओळखला न गेल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, वर्गातील सहभागावर आणि आत्मविश्वासावर होऊ शकतो. त्यामुळे शालेय स्तरावर नियमित नेत्र तपासणी करून दृष्टिदोषाचे लवकर निदान आणि योग्य वेळी उपचार करणे या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
‘प्रत्येक विद्यार्थ्याला वेळेवर नेत्र आरोग्य सेवा मिळावी’
शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, चांगली दृष्टी ही मुलांच्या शिक्षण आणि विकासाचा महत्त्वाचा पाया आहे. या भागीदारीच्या माध्यमातून शासकीय शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला वेळेवर नेत्र तपासणी आणि योग्य नेत्र आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न अधिक बळकट केले जात आहेत. दृष्टिदोषाचे लवकर निदान आणि त्यावर योग्य उपाय केल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, आत्मविश्वास आणि विकासाला मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशनचे संचालक तथा एसिलोरलक्सोटिका ग्रेटर इंडियाचे अध्यक्ष वेणुअंबाती यांनीही या भागीदारीबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र शासन आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टसोबतची दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत करत राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोषाचे वेळेत निदान होण्यास मदत होणार असून, गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या आत्मविश्वासाला आणि सर्वांगीण विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

