(मुंबई / वृत्तसंस्था)
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अरुणा इराणी यांचे पती कुकू कोहली यांचे मंगळवारी वयाच्या ७७व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील एका अनुभवी दिग्दर्शकाची कारकीर्द संपुष्टात आली आहे.
कुकू कोहली यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्यासोबत काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातील विविध कौशल्ये आत्मसात केल्यानंतर कोहली यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणला पहिली संधी देऊन त्याला रातोरात स्टार बनवणारे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन झालं आहे.
‘बेताब’ या गाजलेल्या चित्रपटासाठी त्यांनी सेकंड युनिट दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या पदार्पणाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गोल्डन ज्युबिली ठरला आणि दोन्ही कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळवून देण्यात या चित्रपटाचा महत्त्वाचा वाटा राहिला. त्यानंतर सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अर्जुन’ हा चित्रपटही सिल्व्हर ज्युबिली हिट ठरला.
कुकू कोहली यांच्या दिग्दर्शन कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘फूल और कांटे’. अजय देवगणच्या पदार्पणाचा हा चित्रपट डायमंड ज्युबिली हिट ठरला. या चित्रपटामुळे अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख मिळाली. त्यानंतर कोहली यांनी धर्मेंद्र अभिनीत ‘कोहराम’, तसेच अजय देवगण, अक्षय कुमार आणि करिश्मा कपूर यांच्या भूमिका असलेला ‘सुहाग’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
‘हकीकत’ या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह सात विभागांत नामांकन मिळाले होते. याच चित्रपटासाठी कुकू कोहली यांना स्क्रीन अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
यानंतर त्यांनी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना अभिनीत ‘झुल्मी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पुढे गोविंदाने दुहेरी भूमिका साकारलेला ‘अनारी नं. १’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. ‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटातून त्यांनी पुन्हा वेगळ्या धाटणीचा प्रयत्न केला. या चित्रपटाच्या माध्यमातून संगीतकार नदीम-श्रवण यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले होते.
कुकू कोहली यांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट ‘वो तेरा नाम था’ हा होता. या चित्रपटात अर्जन बाजवा आणि कांची कौल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत राहून कुकू कोहली यांनी व्यावसायिकदृष्ट्या गाजलेले अनेक चित्रपट दिले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील एका अनुभवी दिग्दर्शकाला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
अभिनेत्री अरुणा इराणी आणि कुकू कोहली यांनी १९९० मध्ये लग्न केलं. त्यांच्या नात्याची सुरुवात चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

