(संगमेश्वर / वार्ताहर)
अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२६ अंतर्गत संगमेश्वर तालुकास्तरीय स्पर्धा देवरुख येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य, संधी आणि आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. या स्पर्धेत ताम्हाणे हायस्कूलची विद्यार्थिनी रिया रवींद्र गिजे हिने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले.
पैसाफंड हायस्कूल, संगमेश्वर येथील क्रीशा कपिल इंदानी हिने द्वितीय क्रमांक मिळवला. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या रिया गिजे आणि क्रीशा इंदानी या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुखचा अर्णव सागर सकपाळ आणि न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखचा ध्रुव कौस्तुभ जोशी यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. दादासाहेब सरफरे विद्यालयाची मीरा अनंत लिंगायत आणि कसबा हायस्कूलची सृष्टी सोमनाथ सराटे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्याला सादरीकरणासाठी नियमानुसार सहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील संधी, आव्हाने आणि संभाव्य उपाययोजनांवर प्रभावीपणे आपले विचार मांडले. या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. गौरव पोंक्षे, प्रा. प्रशांत जाधव आणि प्रा. पृथ्वीराज वाडकर यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण सोहळ्यास संगमेश्वर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष अमृत मेंगाल, कोषाध्यक्ष सूरज कदम, सचिव विनोद सरदेसाई, सौ. अर्चिता कोकाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विद्या खाडे यांनी केले, तर अमृत मेंगाल यांनी आभार मानले.
तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक मिळवत रिया गिजे हिने ताम्हाणे हायस्कूलच्या शैक्षणिक कामगिरीत मानाचा तुरा रोवला असून, आता जिल्हास्तरीय स्पर्धेत तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

