(मुंबई / वृत्तसंस्था)
प्रजा फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड 2026’ नुकतेच प्रकाशित करण्यात आले असून, या अहवालात काँग्रेसच्या आमदारांनी आघाडीची कामगिरी केली आहे. मुंबईतील सर्व आमदारांच्या क्रमवारीत मुंबादेवीचे काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख दुसऱ्या, तर धारावीच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना या क्रमवारीत 18वे स्थान मिळाले आहे. भाजपचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी आठवा क्रमांक मिळवत टॉप 10 मध्ये स्थान पटकावले आहे.
प्रजा फाउंडेशनने महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 या कालावधीत मुंबईतून निवडून आलेल्या आमदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून हा अहवाल तयार केला आहे. आमदारांची सभागृहातील उपस्थिती, विधानसभेच्या कामकाजातील सहभाग, त्यांनी विचारलेले प्रश्न तसेच प्रश्नांची गुणवत्ता या प्रमुख निकषांच्या आधारे क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे.
पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबईतील आमदार नागरिकांचे प्रश्न विधानसभेत किती प्रभावीपणे मांडतात, सरकारकडून त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सभागृहाचा कितपत प्रभावी वापर करतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी किती सक्रियपणे पार पाडतात, याचे चित्र या अहवालातून समोर येते.
प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, आमदारांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विधानसभेत पोहोचतात का, हा आमदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना महत्त्वाचा मुद्दा आहे. पंधराव्या विधानसभेतील 33 आमदारांच्या एकत्रित कामगिरीचा विचार करता हे चित्र चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अहवालानुसार, बाराव्या विधानसभेत आमदारांची सरासरी गुणसंख्या 61 होती. ती चौदाव्या विधानसभेत 54 पर्यंत घसरली, तर पंधराव्या विधानसभेत किंचित वाढून 55 झाली आहे. त्यामुळे आमदारांच्या कामगिरीतील ही आकडेवारी केवळ चढ-उतार म्हणून न पाहता, नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर सोपवलेल्या जबाबदारीच्या पूर्ततेचे एक महत्त्वाचे मोजमाप म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे प्रजा फाउंडेशनने म्हटले आहे.
प्रजा फाउंडेशनचे व्यवस्थापक असिफ खान यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे प्रश्न विधानसभेत मांडणे, त्यावर चर्चा घडवून आणणे आणि सभागृहाच्या वेळेचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रजा फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, पंधराव्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 या कालावधीत मुंबईतील आमदारांनी एकूण 2,213 प्रश्न विचारले. त्याच्या तुलनेत बाराव्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशन 2009 ते पावसाळी अधिवेशन 2010 या कालावधीत 7,955 प्रश्न विचारण्यात आले होते. या तुलनेनुसार प्रश्न विचारण्याच्या संख्येत तब्बल 72 टक्क्यांची घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे हे रिपोर्ट कार्ड नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार असून, सभागृहातील सक्रिय सहभाग, प्रश्नांची संख्या आणि गुणवत्ता याबाबत लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे चित्र या अहवालातून स्पष्ट होत आहे.

