( राजापूर / तुषार पाचलकर )
पाचल ग्रामपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत पाचल गावचे सुपुत्र तथा माजी केंद्रप्रमुख विनायक खानविलकर यांची पाचल गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे ग्रामस्थांसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
विनायक खानविलकर हे कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय, पाचलचे विद्यमान कार्यवाहक असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पाचल शाखेच्या स्थानिक समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. केंद्रप्रमुख संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष तसेच पुरोगामी शिक्षक संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
कोरोना काळात कारवली आणि येरडव ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. राजापूर तालुक्यातील जवळेथर, तुळसवडे, कारवली आणि पाचल येथे गेली अकरा वर्षे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली. पाचल विभागात पदवीधर मतदार नोंदणीचे काम करताना त्यांनी अनेक पदवीधर तरुणांची नोंदणी करून घेतली आहे.
आपली मते स्पष्ट, परखडपणे आणि निर्भीडपणे मांडणे हा खानविलकर यांचा स्वभाव मानला जातो. सामान्य परिस्थितीतून प्रचंड मेहनत आणि स्वाभिमानाने वाटचाल करण्याची शिकवण त्यांना आईकडून मिळाली. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाची दखल घेत ग्रामसभेने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी झालेल्या या बिनविरोध निवडीमुळे गावातील सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

