(रत्नागिरी)
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सवा’चा बक्षीस वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता बक्षीस वितरणाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘२ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी’चे कमांडिंग ऑफिसर रामंजुल दीक्षित, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डाॕ शिरसाठ, जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल कल्याण) मल्लिनाथ कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) अभय तेली यांची उपस्थिती होती.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या बाल महोत्सवात विविध संस्थांमधील तसेच नगरपरिषदेच्या शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्य सादरीकरणाने झाली.
अध्यक्षीय भाषणात श्री. माईनकर यांनी आपल्या कारकीर्दीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. तसेच, कमांडिंग ऑफिसर श्री दीक्षित यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. पीएसआय श्री तेली यांनीही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस दलातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिविक्षा अधिकारी अतिश शिंदे यांनी केले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

