(साखरपा / भरत माने)
एसटी वाहतुकीसाठी आंबा घाट सुरू असल्याने घाटमार्गातून ये-जा करणाऱ्या एसटी बस चालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्याबरोबरच वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एसटी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी प्रतिकूल हवामानातही अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. मात्र, मुसळधार पावसात कर्तव्य बजावताना या कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच काही काळ थांबण्यासाठी निवाऱ्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नव्हती.
कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ही गैरसोय लक्षात आल्यानंतर आमदार किरण सामंत यांनी तातडीने दखल घेत निवारा शेडची व्यवस्था करून दिली. त्यामुळे मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता आंबा घाटात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या एसटी व पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आंबा घाटातून एसटी वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. घाटातील परिस्थितीवर लक्ष ठेवणे, वाहनचालकांना मार्गदर्शन करणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, अशी विविध कामे या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत. पावसाळ्यात घाट परिसरात निर्माण होणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांचे काम अधिक जबाबदारीचे ठरते.
अशा परिस्थितीत प्रत्यक्ष मैदानावर कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी तातडीने निवारा शेड उपलब्ध करून दिल्याने कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे खराब हवामानातही त्यांना अधिक सुरक्षितपणे आपले कर्तव्य बजावता येणार आहे.
मोठ्या विकासकामांबरोबरच प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडचणींकडे लक्ष देऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची कार्यशैली यामुळे अधोरेखित झाली आहे. आंबा घाटातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी झटणाऱ्या एसटी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुविधेचा प्रश्न मार्गी लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
पावसाळ्यात आंबा घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कर्तव्याची दखल घेत निवारा शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत काम करताना मोठा आधार मिळाला आहे.

