(राजापूर/ तुषार पाचलकर)
स्मार्ट ग्रामपंचायत पाचलच्या वतीने १५वा वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग तसेच गरजू नागरिकांसाठी विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पाचल ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल ३०० नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमामुळे दिव्यांग आणि गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे.
हा साहित्य वाटप कार्यक्रम गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता ग्रामपंचायत सभागृह, पाचल येथे आयोजित करण्यात आला आहे. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत तसेच युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५वा वित्त आयोगाच्या निधीचा उपयोग केवळ विकासकामांसाठीच नव्हे, तर समाजातील गरजू घटकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत आहे. पाचल ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग आणि इतर गरजू नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमाकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा विशेष सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात तसेच राजापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. दिव्यांग व गरजू नागरिकांना आवश्यक साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही अडचणी दूर होण्यास मदत होणार असून, ग्रामपंचायतीचा हा उपक्रम सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, साहित्य वाटपाचा लाभ मिळणाऱ्या पात्र ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्मार्ट ग्रामपंचायत पाचलच्या वतीने करण्यात आले आहे.

