(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजगावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बरकतअली अब्बास मुकादम यांची सलग १५व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या विक्रमी निवडीमुळे गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी बरकतअली मुकादम यांनी मजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारीही सांभाळत गावाच्या विकासासाठी योगदान दिले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत मजगावने गेल्या अनेक वर्षांपासून गावातील वाद सामोपचाराने सोडवत शांतता, सलोखा आणि एकोप्याचा आदर्श निर्माण केला आहे. या कामात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून बरकतअली मुकादम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गावातील किरकोळ वाद, कौटुंबिक कलह तसेच जमीनविषयक वाद यांसारखी प्रकरणे सामोपचाराने आणि कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे गावातील अनेक वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यापूर्वीच सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे.
गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात गावात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या सलग १५व्यांदा झालेल्या बिनविरोध निवडीमुळे त्यांच्या कार्याला ग्रामस्थांची मिळालेली व्यापक मान्यता अधोरेखित झाली आहे.
निवडीनंतर बरकतअली मुकादम यांनी सांगितले की, “ही निवड माझी नसून मजगावच्या एकीची निवड आहे. गावकऱ्यांनी १५ वेळा माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे. यापुढेही मजगाव तंटामुक्त, शांतताप्रिय आणि विकासाभिमुख ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन.”
यावेळी प्रशासक फय्याज मुकादम, माजी उपसरपंच शरीफ इब्जी, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसैन टेमकर, मुझफ्फर मुकादम, ग्रामविकास अधिकारी अर्चना कळबटे, मजगाव उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका, पोस्टमास्तर सायली गोरे, अंगणवाडी सेविका नफीसा नाखवा, जिक्रिया मुजावर, समीना मुकादम, आशा ताई, बचत गट प्रमुख नुझहत नाकाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बरकतअली मुकादम यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

