( संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे गावचे दानशूर व्यक्तिमत्व व समाजहितासाठी आयुष्य वेचलेले संजय राजाराम लोटणकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (१९ जुलै रोजी) दुःखद निधन झाले.
संजय लोटणकर यांनी आरटीओमध्ये अधिकारी म्हणून काम करताना स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. राजकारण, समाजकारण व क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग राहिला. सकारात्मक दृष्टिकोन व खंबीर व्यक्तिमत्वामुळे ते नेहमीच समाजातील लोकांच्या पाठीशी आधारस्तंभासारखे उभे राहिले. गावातील मंदिराचे बांधकाम, रस्त्यांचे काम किंवा अंतरतालुका क्रीडा स्पर्धा, कोणतीही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. निवृत्तीनंतर अवघ्या चार वर्षांतच ते कायमस्वरूपी गावात वास्तव्यास येऊन समाजसेवेत गुंतले होते.
धार्मिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. साईबाबा, स्वामी समर्थ, शंकर महाराज दत्त संस्थान या धार्मिक मंडळांचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. सलग चाळीस वर्षे त्यांनी भायखळा, मुंबई येथून शिर्डी पदयात्रा केली. नर्मदा परिक्रमा, गिरनार पदयात्रा अशा अनेक कठीण यात्राही त्यांनी पार केल्या. विविध धर्मस्थळांना व धार्मिक संस्थांना भरभरून दानधर्म केला. गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची परंपरा अखेरपर्यंत सुरू राहिली.
त्यांचे जीवन म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा आदर्श होय. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मोठा आधार दिला. आपल्या वागण्या-बोलण्यातून ते कधी मोठे भाऊ, कधी महाराज, कधी दादा म्हणून सर्वांच्या मनात घर करून राहिले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.