(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मोबाईलच्या एका कॉलवर विश्वास ठेवणे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या वापरत नागरिकांना गंडा घालण्याचे सत्र सुरूच ठेवले असून, ऑगस्ट महिन्यातील अवघ्या पाऊण महिन्यात तब्बल १ कोटी १९ लाख १९ हजार ८४८ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः मोबाईल आणि डिजिटल व्यवहारांची पुरेशी माहिती नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना भामट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येत आहे.
भीती निर्माण करणे, आमिष दाखवणे आणि विश्वास संपादन करणे या तीन प्रमुख मार्गांचा वापर करून सायबर भामटे नागरिकांच्या खात्यांवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीचा फोन, संदेश किंवा लिंक स्वीकारण्यापूर्वी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार विशेष चिंताजनक ठरत आहे. दहशतवादाशी संबंधित तक्रारीत नाव असल्याचे सांगून एका ज्येष्ठ महिलेला पोलीस अटकेची भीती दाखवण्यात आली. चौकशीच्या नावाखाली घाबरवून तिच्याकडून तब्बल ८७ लाख ४५ हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकारामुळे सायबर गुन्हेगारांची फसवणुकीची पद्धत किती गंभीर आणि धक्कादायक झाली आहे, हे स्पष्ट होते.
महानगर गॅसचा पुरवठा बंद करण्याची धमकी देत मदतीच्या बहाण्याने एका शिक्षकाची ६ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ‘क्रिप्टो ॲप’ डाउनलोड करण्यास प्रवृत्त करून ८ लाख ६२ हजार रुपये लांबविण्यात आले. बँक अधिकारी असल्याचे भासवून एसबीआय योनो ॲप अपडेट करण्याच्या नावाखाली गोपनीय माहिती मिळवून एका नागरिकाला ५ लाख २६ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला. तर शेअर ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका दाम्पत्याची ११ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
एका क्लिकची किंमत आयुष्यभराची कमाई!
सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळावे. व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या संशयास्पद लिंक, ॲप किंवा संदेशांपासून सावध राहणे आवश्यक आहे. बँक अधिकारी, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी किंवा कोणताही अधिकृत कर्मचारी फोनवर OTP, ATM PIN, पासवर्ड अथवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मागत नाही. त्यामुळे अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तीस देऊ नये. डिजिटल व्यवहारांची माहिती तुलनेने कमी असल्याने ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारांच्या सहज लक्ष्यावर येतात. त्यामुळे कुटुंबातील तरुणांनी ज्येष्ठांना अशा फसवणुकीच्या पद्धतींबाबत वेळोवेळी माहिती देऊन जागरूक करणे आवश्यक आहे.
फसवणूक झाल्यास विलंब नको
सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे लक्षात येताच वेळ न दवडता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार नोंदवावी. आर्थिक व्यवहारातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने तक्रारीला होणारा विलंब गुन्हेगारांना पैसे अन्यत्र वळविण्याची संधी देऊ शकतो. एक कॉल, एक लिंक किंवा एका आमिषाला भुलणे आयुष्यभराची कमाई गमावण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे ‘सावध नागरिक’ हीच सायबर गुन्ह्यांविरोधातील पहिली सुरक्षा भिंत आहे.

