(रत्नागिरी)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते प्रवीण तरडे यांनी रत्नागिरीतील रंगकर्मींसाठी मोठी घोषणा केली आहे. आगामी ‘देऊळ बंद ३’ या चित्रपटाचे सुमारे ५० टक्के चित्रीकरण रत्नागिरीत करण्यात येणार असून, उत्सवी नाट्य स्पर्धेत सहभाग घेतलेल्या कलाकारांसह स्थानिक रंगकर्मींनाही चित्रपटात अभिनयाची संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ही घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात करण्यात आली. १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या तब्बल २४२ दिवस चाललेल्या स्पर्धेचा समारोप रविवारी (५ जुलै) स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उत्साहात झाला.
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. उदय सामंत, रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका मेधा कुलकर्णी तसेच भाटकर कुटुंबीयांच्या वतीने मरिनर दिलीप भाटकर उपस्थित होते.
५७ कलाकारांसाठी कास्टिंग कार्यशाळा
कार्यक्रमात बोलताना डॉ. उदय सामंत यांनी प्रवीण तरडे यांचे आभार मानत, भविष्यात रत्नागिरीत चित्रपट निर्मितीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्पर्धेतील ५७ लक्षवेधी कलाकारांसाठी कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा आयोजित केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. याशिवाय स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या नाटकांचा सावरकर नाट्यगृहात विशेष महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील कलाकारांना मिळणार व्यासपीठ
पालकमंत्री सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद ३’ मध्ये रत्नागिरीतील कलाकारांना संधी देण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नवोदित कलाकारांसाठी चित्रपटसृष्टीचे दार खुले होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनीही स्थानिक रंगकर्मींच्या पाठीशी नगरपालिका कायम उभी राहील, अशी ग्वाही दिली.
सांस्कृतिक रंगत आणि भावनिक क्षण
कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारिणी सदस्य मनोहर जोशी आणि श्वेता जोगळेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या नांदीने झाली. नटश्रेष्ठ रमेश भाटकर यांच्या सुरुवातीच्या नाट्यप्रवासातील आठवणी त्यांच्या डायरीतून नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत भाटवडेकर यांनी रसाळ शैलीत सादर केल्या.
रमेश भाटकर यांच्या पत्नी, निवृत्त सरन्यायाधीश मृदुला भाटकर या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र त्यांनी स्पर्धक आणि आयोजकांसाठी पाठविलेला विशेष व्हिडिओ संदेश उपस्थितांना दाखविण्यात आला.
यशस्वी आयोजनासाठी सर्वांचा सहभाग
स्पर्धेचे प्रास्ताविक नाट्य परिषदेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले. सूत्रसंचालन वामन कदम यांनी केले असून अभिनेते सचिन काळे यांनी त्यांना साथ दिली. बक्षिसांची घोषणा श्रीकांत पाटील, अनुया बाम, ॲड. रजनी सरदेसाई, विनायक जोशी आणि सतीश दळी यांनी केली. स्पर्धा प्रमुख अमेय धोपटकर यांनी गुणांकन प्रक्रियेची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट विभागातील विद्यार्थी, तसेच सिद्धेश बंदरकर यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले. नाट्यगृहातील कर्मचारी धनवंत कासेकर, सागर सकपाळ आणि सहकाऱ्यांनीही उत्कृष्ट सहकार्य केले.

