(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि पदपथांवर बिनधास्तपणे थाटलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी आणि हातगाड्यांविरोधात अखेर नगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सोमवारपासून अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात होत आहे. सार्वजनिक जागा आणि फूटपाथवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही, तर वाहनचालकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांवरून पालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली होती. कोकणनगर परिसरातील कारवाईचा संदर्भ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी मुख्य रस्ते, गर्दीच्या बाजारपेठा आणि फूटपाथवर वाढत चाललेल्या अतिक्रमणांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. सार्वजनिक जागा नागरिकांसाठी की अतिक्रमणधारकांसाठी, असा सवाल उपस्थित करत पालिका प्रशासन या अतिक्रमणांवर ठोस कारवाई कधी करणार, अशी विचारणाही त्यांनी केली होती. यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सार्वजनिक जागा आणि फूटपाथवरील अतिक्रमणांबाबत पालिका प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि पदपथांवरील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि खोकी हटविण्याचा निर्णय सभागृहाने घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत असल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेदरम्यान संभाव्य विरोध, वादविवाद अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नगरपालिकेने पोलिस प्रशासनाकडे कडक बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे कारवाईला विरोध करणाऱ्यांवरही प्रशासनाची नजर राहणार आहे. शहरातील फूटपाथ नागरिकांच्या चालण्यासाठी असताना त्यावरच टपऱ्या, खोकी आणि हातगाड्यांनी कब्जा केल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे चित्र अनेक भागांत पाहायला मिळते. त्यातच मुख्य रस्त्यालगतची अतिक्रमणे वाहतुकीच्या कोंडीत भर घालत असल्याने नागरिकांच्या संतापातही भर पडली आहे.
वर्षानुवर्षे अतिक्रमणांकडे डोळेझाक करणाऱ्या पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. मात्र, ही मोहीम केवळ दोन-चार दिवसांची ‘दिखाऊ कारवाई’ न ठरता सातत्याने सुरू राहणार का, हा खरा प्रश्न आहे. कारवाईनंतर पुन्हा त्याच जागांवर अतिक्रमणे उभी राहिली तर आजची धडक मोहीमही केवळ कागदी शौर्य ठरण्याची शक्यता आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत शहरातील रस्ते आणि पदपथ खरोखरच अतिक्रमणमुक्त होतात का, की कारवाईनंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते, याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

