(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या बहुप्रतीक्षित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ निवड प्रक्रियेला आता अंतिम टप्प्यात वेग आला आहे. जिल्ह्यातील गुणवंत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने घेतलेल्या कठोर छाननीनंतर २६ शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. या मुलाखतींतून केवळ नऊ शिक्षकांची अंतिम पुरस्कारासाठी शिफारस केली जाणार असल्याने शिक्षकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन याप्रमाणे एकूण २७ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ शिक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. त्यामुळे अंतिम नऊ नावांसाठी निवड समितीसमोर गुणवंत शिक्षकांच्या कार्याची कसोटी लागली. मुलाखतीच्या प्रक्रियेत केवळ शैक्षणिक पात्रता किंवा कागदपत्रांपुरते मूल्यमापन न करता शिक्षकांनी प्रत्यक्ष शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाची सखोल पारख करण्यात आली. अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, शाळा सुधारणा आणि सामाजिक योगदान यांसह विविध निकषांवर शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात आले.
वर्गातील अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या आधुनिक आणि कल्पक पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक तसेच सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम आणि शाळेच्या विकासासाठी घेतलेले पुढाकार यांचा निवड प्रक्रियेत विचार करण्यात आला. ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, प्राथमिक शिक्षण अधिकारी मनीषा कदम आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी दीपक मेंगाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
शिक्षक दिनी नऊ गुणवंतांचा सन्मान
मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या नऊ शिक्षकांची अंतिम यादी तयार करून शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर निवड झालेल्या गुणवंत शिक्षकांचा ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनी विशेष सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकविणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि समाजाच्या पुढील पिढीची जडणघडण करणारा घटक आहे. त्यामुळे अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थ्यांसाठीची तळमळ आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या कसोट्यांवर खऱ्या अर्थाने ‘आदर्श गुरुजी’ ठरणाऱ्या त्या नऊ शिक्षकांची निवड कोणाची होते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

