(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही थांबलेली नाही. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी आणि प्रवासी कोकणात दाखल होणार असताना बोगद्यातील ही गळती वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वास गेले असले, तरी पावसाळ्यात दोन्ही बोगद्यांच्या छतासह भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा पाझर सुरू आहे. काही ठिकाणी तर पाण्याचे फवारे थेट रस्त्यावर येत असल्याने बोगद्यातील मार्ग सतत ओला आणि निसरडा राहत आहे. परिणामी वाहनचालकांना कमालीची सावधगिरी बाळगत वाहने चालवावी लागत आहेत. अशा परिस्थितीत अचानक ब्रेक लावावा लागल्यास किंवा वाहन घसरल्यास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पाण्याचा पाझर सुरूच असल्याने या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने तसेच गळती रोखण्यासाठी करण्यात आलेले कोटिंग पावसाच्या पाण्यापुढे टिकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरवरची डागडुजी आणि तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा गळतीमागील मूळ कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा वेळी कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर, निसरडा रस्ता आणि वाढलेली वाहनांची गर्दी यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अपघाताचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बोगद्यातील गळती नेमकी कुठून आणि का होत आहे, याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घ्यावा आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? बोगदा तयार झाला, मात्र त्यातील गळतीचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगद्याची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी महामार्ग विभाग नेमकी कोणती ठोस पावले उचलतो, याकडे आता वाहनचालक आणि कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

