(दापोली)
पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश तोरस्कर यांनी आजपासून पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांची बदली खेड येथे झाली असून, त्यांच्या जागी तोरस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महेश तोरस्कर हे पोलीस दलातील एक अत्यंत अनुभवी, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी विविध पोलिस विभागांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखा, देवरुख, पनवेल शहरातील कळंबोली, सायन ट्रॉम्बे परिसर, तसेच गुन्हे अन्वेषण शाखा (क्राईम ब्रँच युनिट) येथे तब्बल सहा वर्षे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच, वडाळा टर्मिनल पोलिस ठाण्याचे प्रमुख म्हणूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली आहे.
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना, कोकणनगर येथे मध्यरात्री निर्माण झालेला तणाव त्यांनी आपल्या अनुभवाच्या बळावर शांततेत हाताळत प्रशासनाला दिलासा दिला होता. अशा ताणतणावाच्या काळात त्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि नेतृत्वगुण कौतुकास्पद ठरले होते. दापोली पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर तोरस्कर यांनी दापोलीवासीयांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, अमली पदार्थ विरोधी मोहिमेवर विशेष भर देण्यात येईल, असा इशारा ही दिला आहे.
पोलिस निरीक्षक तोरसकर यांच्यातील नेतृत्वगुण हे केवळ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आदेश देणारे नाहीत, तर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे आहेत. त्यांच्या कामाचा लोकाभिमुख पॅटर्न, संवादक्षम भूमिका आणि प्रत्यक्ष मैदानावर उतरून घेतलेली कारवाई अशी त्यांची ओळख आहे.