(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री हातखंबा फाट्याजवळ दुचाकीसमोर अचानक गाय आडवी आल्याने झालेल्या अपघातात ५१ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. याचदरम्यान खेडशीजवळही वाहनाची धडक बसून एका गायीचा जागीच मृत्यू झाला. सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे साळवी स्टॉप ते खेडशीदरम्यान महामार्गावर मोकाट गुरांचा प्रश्न किती भयावह बनला आहे, याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शुक्रवारी (२१ ऑगस्ट) रात्री सुमारे ७.५७ वाजता दिनेश यादव कुमार (वय ५१, मूळ रा. मुंबई, सध्या रत्नागिरी) हे स्प्लेंडर दुचाकी (एमएच ०८ बीए ०७२६) घेऊन रत्नागिरीहून निवळीकडे जात होते. हातखंबा तिठ्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर मुंबई लेनवर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक गाय आडवी आली. त्यामुळे दुचाकीची गायीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दिनेश यादव कुमार यांच्या हाताला, चेहऱ्यावर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना नरेंद्र महाराज यांच्या ॲम्बुलन्समधून तातडीने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर दुचाकी महामार्गाच्या बाजूला सुरक्षित ठेवण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू होती. घटनास्थळी हातखंबा पोलिस मदत केंद्राचे अंमलदार उपस्थित होते.
दरम्यान, खेडशी परिसरातही मोकाट गुरांच्या कळपातील एका गायीला वाहनाची धडक बसली. या धडकेत गायीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने मृत गायीचे दफन केले. या दोन्ही घटनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः साळवी स्टॉप ते खेडशी या पट्ट्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुरे फिरत असल्याने वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. दिवसाढवळ्या गुरे दिसत असली तरी रात्रीच्या वेळी काळोखात अचानक रस्त्यावर येणाऱ्या गुरांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी तर हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे.
महामार्गावर वाहनांचा वेग मोठा असताना अचानक रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या गुरांना चुकविण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एका बाजूला महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दुसऱ्या बाजूला मोकाट गुरांचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. गुरे रस्त्यावर येईपर्यंत प्रशासन जागे होणार नाही का, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि नागरिकांकडून उपस्थित होत आहे. महामार्गावर अपघात झाल्यानंतर पंचनामा, वाहतूक सुरळीत करणे आणि जखमींना रुग्णालयात हलविणे एवढ्यापुरतीच यंत्रणेची भूमिका राहणार असेल, तर अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कोण करणार? एखाद्या निष्पाप वाहनचालकाचा जीव गेल्यानंतरच मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची प्रशासनाला जाग येणार आहे का? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
प्रशासनाने आता तरी डोळे उघडून….
मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई, गुरांना रस्त्यावर सोडणाऱ्यांवर दंडात्मक उपाय, संवेदनशील ठिकाणी तातडीने प्रतिबंधक उपाययोजना आणि संबंधित स्थानिक यंत्रणांनी नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. अन्यथा मुंबई-गोवा महामार्गावरील हा ‘मोकाट गुरांचा सापळा’ आणखी किती जणांच्या जीवावर बेतणार, याची वाट प्रशासन पाहत आहे का? अशी संतप्त भावना वाहनचालकांमध्ये व्यक्त होत आहे. रात्रीचा महामार्ग प्रवास म्हणजे मृत्यूच्या दारातून प्रवेश केल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता तरी डोळे उघडून ठोस कारवाई करणे गरजेचे आहे.

