(रत्नागिरी /वार्ताहर)
मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या ६५ वर्षीय खलाशाला अचानक चक्कर येऊन बोटीतच कोसळल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री रत्नागिरीत घडली. लक्ष्मण पांडुरंग डावकरे (वय ६५, रा. पूर्णगड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डावकरे हे सडामिऱ्या येथील दिनेश शिवाजी सावंत यांच्या मालकीच्या ‘पुष्पगंधा’ या मच्छिमारी नौकेवर खलाशी म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजता तांडेल सुशांत सुधाकर महाकाळ, लक्ष्मण डावकरे आणि अन्य खलाशी मच्छिमारीसाठी मिरकरवाडा बंदरातून समुद्रात गेले होते.
मच्छिमारी सुरू असताना डावकरे यांना अचानक चक्कर आली आणि ते बोटीतच कोसळले. त्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे इतर खलाशांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तांडेल सुशांत महाकाळ यांनी तातडीने नौका मिरकरवाडा बंदरात परत आणली. त्यानंतर डावकरे यांना खासगी वाहनातून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती अधिक खालावली. वैद्यकीय अधिकारी डॉ. पियूष यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती रात्री ११.०० वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, लक्ष्मण डावकरे यांच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पूर्णगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

