(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज, मालगुंड येथील दोन विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
इयत्ता सातवीसाठी घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत मालगुंड विद्यालयातील दुर्वा योगेश सुर्वे हिची तालुका गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा, वरची निवेंडी येथून उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेली आणि सध्या मालगुंड विद्यालयात शिक्षण घेत असलेली आर्या मोहन शिगवण हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
दोन्ही विद्यार्थिनींनी अभ्यासावर सातत्याने लक्ष केंद्रित करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांना प्रशालेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, सहसचिव श्रीकांत मेहंदळे आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दुर्वा सुर्वे आणि आर्या शिगवण यांचे परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

