(रत्नागिरी / वार्ताहर)
मनसे रत्नागिरी विधानसभा आयोजित पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत मावळंगे येथील अजय प्रकाश पारकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गावडे आंबेरे येथील रजनीश रामजी वासावे यांनी द्वितीय, तर रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील श्रेयस अजित मयेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. गोळप येथील सुतेज हरिश्चंद्र भाटकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते अजय प्रकाश पारकर यांनी दगडी चित्रकला सजावट सादर केली होती. रजनीश रामजी वासावे यांनी केदारेश्वर मंदिर गुहा देखावा, तर श्रेयस अजित मयेकर यांनी धूतपापेश्वर मंदिर देखावा साकारला होता. सुतेज हरिश्चंद्र भाटकर यांनी ‘निसर्ग वाचवा’ हा विषय मांडला होता.
या स्पर्धेचे आयोजक आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांनी सर्व विजेत्यांचे तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


