(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामाला वेग देण्याच्या नावाखाली ठेकेदार कंपनीकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र खेडशी-महालक्ष्मी स्टॉपजवळ पाहायला मिळत आहे. महालक्ष्मी मंदिराजवळ महामार्ग ओलांडण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या मुखावरच भला मोठा खड्डा पडला असून, त्यात दिवस-रात्र पाणी साचत असल्याने हा भुयारी मार्ग की ‘पाणथळ जागा’, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गावरील वाहतूक बायपासवरून वळविण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपासून मुख्य मार्गावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे एसटीचे बसथांबे बायपास मार्गावर असल्याने बसचालकांना त्या मार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे. परिणामी वाहनांची वाहतूक, पादचाऱ्यांची ये-जा आणि बस प्रवाशांची गैरसोय यांचा विचित्र मेळ येथे पाहायला मिळत आहे. महालक्ष्मी मंदिराच्या बाजूने नागरिकांना महामार्गाच्या पलीकडे जाण्यासाठी ठेकेदार कंपनीने भुयारी मार्गाची निर्मिती केली आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षित मार्गासाठी उभारलेल्या या सुविधेच्या प्रवेशद्वारावरच मोठा खड्डा पडला आहे. खड्ड्यात साचलेले पाणी आणि चिखलामुळे भुयारी मार्गाचा वापर करताना पादचाऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. विशेषतः शाळकरी मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाण्यासाठी आणि परतताना मुलांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याने पालकांमध्येही नाराजी आहे.
या भुयारी मार्गातून लहान वाहनेही ये-जा करत असल्याने खड्ड्याची स्थिती आणखी बिकट झाली आहे. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे खड्डा अधिक खोल होत असून, पाण्याखाली त्याची खोली किती आहे याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार किंवा पादचारी घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाच्या कामातून प्रवास सुलभ आणि सुरक्षित होणे अपेक्षित असताना, नागरिकांना साध्या भुयारी मार्गातून जाण्यासाठीही पाण्यातून वाट काढावी लागत असेल तर कामाच्या दर्जावर आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. महामार्गाचे कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असताना भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावरील एवढा मोठा खड्डा संबंधित यंत्रणेला आणि ठेकेदार कंपनीला दिसत नाही का? पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन निचरा व्यवस्थेची उपाययोजना करणे ही जबाबदारी कुणाची? नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच खड्डे बुजवायचे की अपघात घडल्यानंतर जागे व्हायचे? असे संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत.
महामार्ग विकासाच्या कामात वेग आणि भव्यता दाखविण्यापेक्षा पादचाऱ्यांची सुरक्षितता, दर्जेदार बांधकाम आणि मूलभूत देखभाल यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. खेडशी-महालक्ष्मी स्टॉपजवळील या भुयारी मार्गाची तातडीने पाहणी करून खड्डा बुजवावा, पाण्याचा निचरा करावा आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

