(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील कोंडमळा येथे धोकादायक स्थितीत उभ्या ठेवलेल्या डंपरला मागील बाजूने जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात महावितरणचे वायरमन अमित एकनाथ हुमणे (३०, रा. आगवे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि. ७) रात्री घडला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या शौकद अली या डंपरचालकाविरुद्ध सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश हुमणे हे डंपर घेऊन आगवे येथून चिपळूणकडे येत होते. दरम्यान, कोंडमळा वळणावर शौकद अली यांनी आपला डंपर डाव्या मार्गिकेच्या मध्यभागी विनासंरक्षण, कोणतेही सूचक चिन्ह न लावता उभा केला होता. या निष्काळजीपणामुळे सुरेश हुमणे यांच्या डंपरची त्या उभ्या डंपरला मागील बाजूस जोरदार धडक बसली. धडक तीव्र असल्याने क्लिनर सीटवर बसलेल्या अमित हुमणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुरेश हुमणे हेही या अपघातात जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
अमित हुमणे हे २०१५ मध्ये महावितरणमध्ये वायरमन म्हणून रुजू झाले होते. केवळ कार्यक्षम कर्मचारी म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. महावितरण कबड्डी संघात त्यांचा मोलाचा सहभाग असून, संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या निधनाने आगवे गावासह महावितरण परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

