(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात लक्षणीयरीत्या वाढत आहे. पासपोर्ट सेवा अधिकाधिक अद्ययावत होत गेल्याने आणि बहुतांश प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने पासपोर्ट काढणे आता पूर्वीपेक्षा खूपच सुलभ झाले आहे. परिणामी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी पासपोर्ट मिळविले आहेत.
परदेश प्रवासासाठी पासपोर्ट अनिवार्य असल्याने पूर्वी नागरिकांना पासपोर्टसाठी मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागत असत. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट कक्ष सुरू करण्यात आला. आता ही सुविधा आणखी विस्तारली असून राजापूर येथील पोस्ट कार्यालयात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी व वेळेची बचत करणारी ठरली आहे.
पासपोर्टसाठी अर्ज करताना आधारकार्ड, मतदार ओळखपत्र किंवा छायाचित्र असलेला अन्य वैध ओळख पुरावा यांची सत्यप्रत तसेच मूळ कागदपत्रे सादर करावी लागतात. सामान्य पासपोर्टसाठी १,५०० रुपये शुल्क आकारले जाते. हा पासपोर्ट दहा वर्षांसाठी वैध असतो. अर्जानंतर पोलिसांकडून पडताळणी केली जाते आणि साधारणपणे पंधरा दिवस ते एका महिन्याच्या कालावधीत पासपोर्ट नोंदणीकृत टपालाद्वारे अर्जदाराच्या पत्त्यावर पाठविला जातो.
शिक्षण, नोकरी, व्यवसायाबरोबरच परदेशी पर्यटनासाठीही जाणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे. सध्या ऑनलाइन प्रणालीमुळे अर्जदारांना वारंवार कार्यालयात खेपा मारण्याची गरज उरलेली नाही. अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर कागदपत्र तपासणीसाठीची मुलाखत तारीखही अर्जदार स्वतः ठरवू शकतो. तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी तत्काळ पासपोर्टची सुविधाही उपलब्ध असून, त्यासाठी दुप्पट शुल्क म्हणजे ३,००० रुपये भरावे लागतात. परदेशात उच्च शिक्षण व नोकरीच्या संधी वाढत असल्याने, तसेच पर्यटनासाठीही मागणी वाढल्याने परदेशवारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागते. या संकेतस्थळावर शुल्क भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच अपॉइंटमेंट निश्चित करणे शक्य आहे. तीन उपलब्ध तारखांपैकी एक तारीख निवडण्याची सुविधा असून, ही संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या मोबाईलवरूनही सहज करता येत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

