(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील मोसम गावातील रेल्वे बोगद्यात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक क्रमांक २७१/१० ते २७१/२ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसम गावातील रेल्वे बोगद्यात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील उदय वासुदेव तावडे यांनी राजापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
सदर व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. संबंधित व्यक्तीचा रंग सावळा असून केस काळे-पांढरे आहेत. त्याने गुलाबी रंगाचा फुल शर्ट, पांढरे बनियन, पांढऱ्या रंगाची लुंगी आणि चॉकलेटी रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले आहे. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर काळ्या रंगाचे स्टेनलेस स्टीलचे घड्याळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सदर व्यक्ती रेल्वेतून खाली पडून गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी राजापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास राजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
पोलीस निरीक्षक अमित यादव : 9273926420
पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे : 7352087482
पोलीस हेडकॉन्स्टेबल रहीम मुजावर : 7272866786

