मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून कारची जोरदार धडक, कारचालक ठार
( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गावरील हातखंबानजीक रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शनिवारी, (दिनांक 11 जानेवारी 2025 ) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अवजड वाहतूक करणारा ट्रेलर डाव्या साईडला जात असताना मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार चालक नितीन श्रीकांत शिरवळकर (वय- 64 वर्षे, रा. सायन पूर्व मुंबई) हा जागीच ठार झाला.
हातखंबापासून निवळीपर्यंत काही भागात काँक्रीटीकरणाच्या दोन्ही मार्गिका पूर्ण झाल्या आहेत. या काँक्रीटीकरणाच्या मार्गकिकेवरून वाहनचालक प्रचंड वेग धारण करून मार्गक्रमण करत असतात. हातखंबा पट्ट्यात महामार्गाच्या बाजूला अनेक हॉटेल, ढाबे असल्याने अनेक वाहनचालक जेवण करण्यासाठी किंवा विश्रांतीसाठीही थांबतात. माल वाहतूक करणारा ट्रेलर ( गाडी नंबर GJ-27TF6818 ) हा गोवाहून नवी मुंबईच्या दिशेने जात होता. या ट्रेलरवरील चालक लिंकन पाल (वय 25, रा.उत्तर प्रदेश जि. प्रतापगड) हातखंबानजिक टाटा शोरूमजवळ आला असता ट्रेलरचा वेग कमी करून रस्त्याच्या बाजूला घेत होता. याच दरम्यान मागून वेगवान येणाऱ्या कार चालक नितीन श्रीकांत शिरवाडकर यांनी ट्रेलरला पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात ट्रेलरच्या मागील बाजूला असणारा लोखंडाचा भाग हा कारमधील ( गाडी नंबर MH01AX9282 ) चालकाच्या आसणापर्यंत घुसल्याने कार चालक नितीन शिरवाडकर यांच्या हाता-पायांसह डोक्याला गंभीर इजा झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तेथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन अती गंभीर अवस्थेत असलेल्या शिरवाडकर यांना तत्काळ गाडीबाहेर काढले. मात्र त्यांची कोणतीही हालचाल होत न्हवती.
या अपघाताची माहिती वाहतूक पोलीसांसह हातखंबा येथील नरेंद्रचार्य महाराज नाणिज संस्थानची रुग्नवाहिकेच्या चालकांना मिळताच काही मिनिटांत रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेतून अती गंभीर अवस्थेत असलेले नितीन शिरवाडकर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहे.