(जाकादेवी / संतोष पवार)
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉलमध्ये कास्ट्राईब कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेची बैठकीत कास्ट्राईब कर्मचारी राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेवराव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघ पुणे यांचे कार्यालयाकडून संघटना PN-5283 नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाले आहे .याबद्दल राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी येथे कोल्हापूर मुख्यालयी कार्यालय येथे संघटनेचे राज्याध्यक्ष नामदेवराव कांबळे व राज्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नामदेवराव कांबळे यांचा सत्कार कास्ट्राईब शासकीय कर्मचारी महासंघाचे महासचिव दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कास्ट्राईब शासकीय कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुशिलकुमार कांबळे यांच्या हस्ते कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाजीराव प्रज्ञावंत यांचा सत्कार करण्यात आला. कोषाध्यक्ष नंदकुमार चौगुले यांचा सत्कार कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांचा सत्कार रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य संघटक पंढरीनाथ कांबळे यांचा सत्कार कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकारणी सदस्या सौ. चंद्रकला कांबळे यांचा सत्कार शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष दयानंद सरवदे यांच्या हस्ते करण्यात आला.
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी नामदेवराव कांबळे यांची निवड झाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.कास्ट्राईब कर्मचारी महासंघात केलेल्या ४० वर्ष कामाचा प्रदीर्घ अनुभव कास्ट्राईब कर्मचारी संघटनेला निश्चित होईल,असा विश्वास व्यक्त केला गेला. कास्ट्राईब शासकीय कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुशील कुमार कांबळे म्हणाले की, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेला मिळालेले हे नेतृत्व. शांत, संयमी, निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व आहे. शासकीय कर्मचारी महासंघाचे महासचिव दिलीप पवार यांनी संघटना लोगो विषयी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. लोगोत असलेल्या तीन मनुष्याच्या प्रतिकृती म्हणजे एससी एसटी, ओबीसी यांचे प्रतिनिधित्व करतात. या तीन घटकांना एकत्र करण्याचे काम संघटनेला करावयाचे आहे. तरच शासन दरबारी आपले मत विचारात घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष मनोगतात नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष नामदेवराव कांबळे म्हणाले की, इतरांच्यावर टीका टिप्पणी न करता आपण कार्याच्या माध्यमातून सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. ७ मे २०२१ च्या परिपत्रकानुसार थांबलेले मागासवर्गीयांचे पदोन्नतीचे धोरण राबवण्यास भाग पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संघटनेचा कार्यभार सर्वजण मिळून पारदर्शकपणे पार पाडूया. संघटना वाढीसाठी एकजुटीने काम करूया. राज्यातील कर्मचारी वर्ग आपल्याकडे आशेने पाहत आहे. राज्यातील एसी,एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करायचा आहे. यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन कामाला लागा. संघटना एक चळवळीचे माध्यम आहे. सामाजिक चळवळ म्हणून काम करूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या राज्य कार्यकारिणीच्या राज्य स्नेह मेळाव्यास दिलीप पवार, अशोक दाभाडे(पुणे ) सुशील कुमार कांबळे, प्रशांत झाल्टे, मिलिंद कांबळे, चंद्रकांत मस्के (सातारा), प्रमोद काकडे, दयानंद सरवदे, उत्तम मंगल, सुरेश कोळी, अशोक हेळवी, जगन्नाथ साबळे (सांगली), गौतम वर्धन, संजय कुर्डूकर, पी. डी.सरदेसाई, शामराव कांबळे, प्रताप तराळ ( कोल्हापूर ), निवास पाटील,प्रभाकर कांबळे, सुधाकर कांबळे, विजय धनवडे ( रत्नागिरी) महादेव कांबळे( इचलकरंजी ) या सत्कार प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमात आलेल्या सर्वांचे आभार कार्यकारणी सदस्या सौ. चंद्रकला कांबळे यांनी मानले.

