(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडून रस्ता खचल्याने बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, खचलेल्या भागातून एसटी वाहने अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने चालविण्याच्या स्पष्ट सूचना एसटी विभागाने चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडून रस्ता खचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ९ ऑगस्टपासून घाटातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यापूर्वीच मालवाहतूक तसेच अवजड वाहनांनाही या मार्गावर बंदी घालण्यात आली होती. वाहतूक बंद झाल्याने वाहनधारक, प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी यांची मोठी गैरसोय झाली होती. पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाढला होता.
या परिस्थितीची दखल घेत आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंबा घाटातील खचलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रांताधिकारी जीवन देसाई, संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड तसेच महसूल विभागातील अधिकारी आणि रत्नागिरी व कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
पाहणीनंतर आंबा घाटातील वाहतूक आवश्यक ती खबरदारी घेऊन आणि वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवून सुरू करता येऊ शकते, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विभाग नियंत्रक जानराव यांचा आदेश रत्नागिरी वाहतूक विभागाला प्राप्त झाल्यानंतर आंबा घाटातून एसटी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. यासाठी वाहतूक अधिकारी सचिन सुर्वे यांचे सहकार्य लाभले.
एसटी वाहतूक सुरू झाल्यानंतर दरडग्रस्त ओझरे खिंड परिसरात रत्नागिरी विभागाची मार्ग तपासणी टीम तैनात करण्यात आली आहे. सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे, टी.सी. सुनील माळी, चालक विश्वास कनवजे आणि यशवंत मयेकर हे खचलेल्या भागात थांबून एसटी चालक-वाहकांना मार्गदर्शन करत आहेत. ओझरे खिंडीतील खचलेल्या रस्त्यावरून वाहने अत्यंत सावकाश चालवावीत, वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवावे आणि परिस्थितीनुसार आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना चालकांना देण्यात येत आहेत.
एसटी वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर देवरुख बसस्थानकातून सकाळी ७.१५ वाजता सुटणारी देवरुख-लातूर एसटी बस आंबा घाटातून सुखरूप आणि व्यवस्थित मार्गस्थ झाल्याची माहिती सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे यांनी दिली. त्यामुळे आंबा घाटातून एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि प्रवासी दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी एसटी वाहतूक सुरू करण्यासाठी आमदार भैय्या सामंत यांनी रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून पुढाकार घेतला. वाहतुकीची अडचण दूर करण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे प्रवासी वर्गातून स्वागत करण्यात येत असून, आमदार भैय्या सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल तसेच संबंधित वाहतूक व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहेत.
दरम्यान, आंबा घाटातील रस्ता खचलेल्या भागातून एसटी वाहतूक सुरू झाली असली तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवूनच वाहने चालवावीत, तसेच प्रवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घाटातील रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत या मार्गावर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

