(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील शिवने येथील ज्येष्ठ दुग्ध व्यावसायिक श्रीकृष्ण जयराम हळबे (९२) यांचे मंगळवारी दुपारी ३ वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिवने गावावर शोककळा पसरली.
श्रीकृष्ण हळबे यांनी शिवने येथे बागायती व शेतीसोबतच पशुपालन करत तब्बल तीन दशकांहून अधिक काळ दुग्ध व्यवसाय केला. त्या काळात शिवने येथे जाण्यासाठी पूल नसतानाही ते पायी प्रवास करत, तर पावसाळ्यात होडीतून संगमेश्वर येथे येऊन हॉटेल व्यावसायिकांना दूध पुरवत असत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनत आणि जिद्दीने त्यांनी दुग्ध व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
आयुष्याच्या अखेरपर्यंत ते करारी आणि स्वावलंबी जीवन जगले. त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता. निधनापूर्वी दोन-तीन दिवस त्यांनी अन्नग्रहण केले नव्हते; मात्र त्यांची दैनंदिन वर्तणूक नेहमीप्रमाणेच होती. सोमवारी रात्री त्यांनी दिवंगत झालेल्या आपल्या सर्व बहिणींची आठवण काढली. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी घरातील सर्वांची आस्थेने चौकशी केली आणि त्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी ७.१५ वाजता शिवने येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गावाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रीकृष्ण हळबे यांच्या पश्चात माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मुलगा रवींद्र ऊर्फ नाना हळबे, मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

