(संगमेश्वर / प्रतिनिधी)
वातानुकूलित बसचे भाडे आकारायचे आणि प्रवाशांच्या पदरी मात्र गैरसोय, घाम आणि रस्त्यावरची प्रतीक्षा द्यायची, असा प्रकार देवरुख आगाराच्या कारभारातून पुन्हा एकदा समोर आला आहे. देवरुख–रत्नागिरी मार्गावर धावणारी एसी बस प्रवासाच्या अवघ्या अर्ध्या तासातच बंद पडल्याने प्रवाशांना भररस्त्यात ताटकळत बसण्याची वेळ आली. त्यामुळे एसटीच्या नियोजनावर आणि देखभालीवर संतप्त प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
देवरुख आगारातून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रत्नागिरीकडे निघालेली एसी बस सुमारे सहा वाजता आंबव कॉलेज परिसरात पोहोचताच बंद पडली. कामावरून घरी परतणारे नोकरदार, विद्यार्थी तसेच अन्य प्रवाशांना अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. प्रवाशांकडून साध्या एसटीपेक्षा जादा भाडे आकारले जाते. त्याबदल्यात वातानुकूलित प्रवास, वेळेचे नियोजन आणि विश्वासार्ह सेवा मिळणे अपेक्षित असते. मात्र, बसच भररस्त्यात बंद पडत असेल तर जादा भाडे आकारण्याचे औचित्य काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, नियमित साध्या बसच्या फेऱ्यांमध्ये बदल करून महागड्या एसी बस प्रवाशांच्या माथी मारल्या जात असल्याची तक्रारही प्रवाशांकडून होत आहे. पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागते; मात्र त्या तुलनेत सेवा मिळत नसल्याने हा प्रकार म्हणजे ‘भाडे स्टारचे आणि सेवा भंगाराची’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
एसटी बस मार्गावर सोडण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी केली जाते की नाही, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. प्रवाशांकडून पूर्ण भाडे घेऊन त्यांना अर्ध्या वाटेवरच अडकवणे हा केवळ तांत्रिक बिघाडाचा विषय नसून, प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि एसटीच्या विश्वासार्हतेशी संबंधित प्रश्न आहे. एकीकडे अत्याधुनिक एसी बससेवेचे गाजर दाखवायचे आणि दुसरीकडे देखभाल व नियोजनाच्या अभावामुळे प्रवाशांची रस्त्यावर फरफट करायची, हा प्रकार संतापजनक असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
देवरुख आगारावर वरिष्ठ प्रशासनाचा ‘अंकुश’ कधी?
वारंवार निर्माण होणाऱ्या गैरसोयींबाबत देवरुख आगार प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. एसी बसची नियमित तांत्रिक तपासणी, फेऱ्यांचे योग्य नियोजन आणि प्रवाशांना पर्यायी व्यवस्था देण्याबाबत आगार प्रशासन काय पावले उचलणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांच्या खिशातून जादा भाडे घेऊन त्यांना रस्त्यावर ताटकळत ठेवणे थांबवावे आणि देवरुख आगाराच्या कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अन्यथा या मनमानी कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.

