(रत्नागिरी / वैभव पवार)
‘अग्निपंख’, ‘दीपस्तंभ’, ‘रातराणी’, ‘गंध निशिगंधाचा’, ‘डॅडी आय लव यू’ यांसारख्या दर्जेदार नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध करणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या नाट्यसंपदेचा आणि त्यांच्या समृद्ध रंगप्रवासाचा पुन्हा एकदा जागर होणार आहे. कै. प्र. ल. मयेकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त समर्थ रंगभूमी निर्मित ‘प्र. ल.’ हा माहितीपट मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे हा माहितीपट सह्याद्री वाहिनीवर सातव्यांदा प्रसारित होत आहे.
मराठी रंगभूमीवर आपल्या लेखणीची स्वतंत्र छाप उमटविणाऱ्या प्र. ल. मयेकर यांनी विविध विषयांवरील एकांकिका आणि नाटकांसह चित्रपट, मालिका तसेच कथासंग्रहाच्या माध्यमातूनही साहित्य आणि मनोरंजन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या ‘अथ मनुस जगन हं…’मधून जंगल्याच्या भाषेची आगळी निर्मिती अनुभवायला मिळाली, तर ‘पांडगो इलो रे बा इलो…’ने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. ‘तक्षकयाग’सारख्या नाटकातून राष्ट्रभक्तीचा रोमांचही त्यांनी रंगभूमीवर प्रभावीपणे साकारला.
प्र. ल. मयेकर यांच्या या समृद्ध साहित्यिक आणि रंगकर्मी प्रवासाचा मागोवा ‘प्र. ल.’ या माहितीपटातून घेण्यात आला आहे. त्यांच्या एकांकिका, नाटके, चित्रपट, मालिका आणि कथासंग्रहांच्या इतिहासाबरोबरच त्यांच्या सोबत काम केलेल्या अनेक दिग्गज कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ आणि रंगकर्मी यांनी सांगितलेल्या आठवणी व अनुभवांमुळे हा माहितीपट अधिकच समृद्ध झाला आहे.
या माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांचे आहे. माहितीपटासाठी अभिनेता अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी निवेदन केले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी अजय बाष्टे यांनी सांभाळली असून, संकलन धीरज पार्सेकर यांनी केले आहे. ध्वनीमुद्रण उदयराज सावंत यांच्या एस. कुमार स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. माहितीपटाचे दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी केले असून, देवीलाल इंगळे यांनी निर्मिती सहाय्य केले आहे.
प्र. ल. मयेकर यांच्या रंगभूमीवरील कार्याचा जवळून अनुभव घेतलेल्या अनेक मान्यवरांनी या माहितीपटाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. कुमार सोहनी, प्रसाद कांबळी, पद्मश्री मोहन वाघ, अभिनेते अरुण नलावडे, संजय मोने, चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, शीतल शुक्ला, माधवी जुवेकर, तंत्रज्ञ कै. अविनाश बोरकर, कै. प्र. ल. मयेकर यांच्या कन्या विशाखा मयेकर-सहस्रबुद्धे, डॉ. रवी बापट आणि रंगकर्मी श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या आठवणी आणि अनुभव सांगत प्र. ल. मयेकर यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे.
प्र. ल. मयेकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यांच्या नाटकांची वैशिष्ट्यपूर्ण भाषा, सामाजिक आणि राष्ट्रभक्तीपर आशय तसेच त्यांच्या रंगप्रवासातील महत्त्वाचे टप्पे या माहितीपटातून उलगडण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा आणि रंगभूमीवरील योगदानाचा इतिहास नव्या पिढीसमोर पोहोचण्यास या माहितीपटाची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.
ज्येष्ठ नाटककाराच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि मराठी रंगभूमीच्या एका समृद्ध पर्वाची आठवण करून देणारा ‘प्र. ल.’ माहितीपट मंगळवारी सकाळी ९ वाजता सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. सह्याद्री वाहिनीवर या माहितीपटाचे सातव्यांदा होणारे प्रसारण हे प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादाची आणि प्र. ल. मयेकर यांच्या कार्याची असलेली दीर्घकालीन लोकप्रियता अधोरेखित करणारे ठरते.

