(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी आणि बालकांसाठी अधिक सुरक्षित, सन्मानजनक व संवेदनशील बनविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय भूमिका बजावण्याची गरज आहे. महिलांचा आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि बालकांचे हक्क जपणारे वातावरण निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन ऑक्झिलियम एम्पॉवरमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्रीनिवास सावंत यांनी केले.
ऑक्झिलियम एम्पॉवरमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा (पॉश अॅक्ट), पॉक्सो कायदा २०१२, बालहक्क आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा या विषयांवर आधारित तीन दिवसीय प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम २९ ते ३१ मे दरम्यान रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीनिवास सावंत यांनी प्रशिक्षणामागील उद्दिष्टे आणि त्याचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, बालसंरक्षण अधिकारी समृद्धी वीर आणि पीएसआय अभय तेली यांनी संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, महिला व बालसुरक्षा तसेच जनजागृतीच्या गरजेवर मार्गदर्शन केले.
कायदेसल्लागार विकास सावंत यांनी पॉश कायद्याचा इतिहास, त्यामागील पार्श्वभूमी, कायद्याची निर्मिती आणि त्यामध्ये कालानुरूप झालेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि संवेदनशील समाज घडविण्याच्या प्रक्रियेत प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
अॅड. विनया घाग आणि शिरीष दामले यांनी बालहक्क, बालसंरक्षण, बालमजुरी, बालविवाह, मानवी तस्करी तसेच बालकांशी संबंधित विविध कायद्यांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास चाइल्ड अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि जीवन आनंद संस्थेचे प्रमुख रामचंद्र अडसुळे, संरक्षण अधिकारी दीपाली चांदबोधले यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
बालकांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी
मार्गदर्शनादरम्यान बालके ही समाजातील सर्वाधिक संवेदनशील घटक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. कौटुंबिक हिंसाचार, बालमजुरी, बालविवाह, मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर समस्यांपासून त्यांचे संरक्षण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. बालपणी होणारा अन्याय मुलांच्या भविष्यासह समाज आणि देशाच्या प्रगतीवरही परिणाम करतो, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
संकटग्रस्त, हरवलेली, शोषणाला बळी पडलेली किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांसाठी १०९८ चाइल्ड हेल्पलाइन हा २४ तास सुरू असलेला मोफत राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक असून, बालशोषणाविरोधात कोणतीही व्यक्ती या क्रमांकावर तक्रार अथवा माहिती देऊ शकते, अशी माहितीही प्रशिक्षणात देण्यात आली.
फोटो : पॉश अॅक्ट, बालहक्क आणि बालसंरक्षण विषयावरील प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी. समवेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, श्रीनिवास सावंत, अॅड. विनया घाग, विकास सावंत, शिरीष दामले व अन्य मान्यवर.

