(मुंबई / वृत्तसंस्था)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी अभिनेता इम्रान खान याला २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला आव्हान देण्यासाठी इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. याचिकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह एसआयआर प्रक्रियेतील गोंधळाच्या मुद्द्यावरून १० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनात अभिनेता इम्रान खान यानेही उत्स्फूर्तपणे सहभागी होत तीव्र निदर्शने केली होती. यावेळी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर आता त्याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक असून, तो भारतात ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (OCI) कार्डधारक म्हणून वास्तव्यास आहे. आंदोलनातील सहभागाच्या प्रकरणात नियमभंग केल्याच्या कलमाखाली परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय (FRRO) आणि मुंबई पोलिसांनी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायद्यान्वये त्याला ही नोटीस बजावली आहे. या नोटिशीविरोधात अभिनेता उच्च न्यायालयात दाद मागणार असून, त्यासाठी लवकरच याचिका दाखल केली जाणार आहे.


