(चिपळूण / रत्नागिरी)
साखरपुड्याच्या आनंदसोहळ्यात अज्ञात चोरट्याने डल्ला मारत तब्बल १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कोडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात घडली. वराच्या खोलीत ठेवलेल्या हँडबॅगेतील दागिन्याच्या बॉक्सवर चोरट्याने हात साफ केला. या प्रकरणी ठाणे येथील जागृती संदेश मोरे (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ११ नोव्हेंबर रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जागृती मोरे यांनी त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आईकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. त्यांच्या आईने हे मंगळसूत्र हँडबॅगेतील बॉक्समध्ये ठेवून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कोडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात नेले होते. कार्यक्रमादरम्यान ही हँडबॅग मंगल कार्यालयातील वराच्या खोलीत ठेवण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हँडबॅगेतील बॉक्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले. चोरीला गेलेल्या मंगळसूत्राचे वजन ४४.४८० ग्रॅम असून, त्यामध्ये सोन्याचे मणी, पट्टीचे डिझाइन आणि दोन सोन्याच्या डवलींचा समावेश आहे. त्याची किंमत १ लाख ८७ हजार ३४९ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नातेवाइकांकडे चौकशी करूनही मंगळसूत्राचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर मोरे यांनी पोलिसांत धाव घेतली.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. घटनेनंतर तब्बल ११ दिवसांनी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.५८ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.


