(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ग्रामीण भागासह प्रमुख रस्ते आणि सर्व्हिस रोडवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मिरजोळे, कारवांचीवाडी, लांजा आणि पूर्णगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २५ ऑगस्ट रोजी वाहतुकीस अडथळा आणि धोका निर्माण केल्याप्रकरणी पाच वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचदरम्यान लांजा पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात अमोल दत्ताराम खोसरे (वय ३६, रा. हनुमाननगर, मिरजोळे) याने त्याच्या ताब्यातील एमएच-४३/यू-५५८४ क्रमांकाचा ट्रक जी.एफ. कंपनी ते एफसीआय गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एम.एम. फिशरीज कंपनीसमोर अशा पद्धतीने उभा केल्याचा आरोप आहे की, त्यामुळे इतर वाहनांना तसेच नागरिकांना ये-जा करताना अडथळा आणि धोका निर्माण झाला. या प्रकरणी पोहेकॉ. प्रविण कल्लापा पाटील यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.५० वाजता घडल्याचे नमूद आहे.
कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव मार्गावरील सर्व्हिस रोडवरही वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. सलिम पैगंबर मूल्ला (वय ३०, रा. गलाबवाटिका इमारत, रवींद्रनगर, कारवांचीवाडी) याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच-०८-एपी-८००१) सर्व्हिस रोडवर अशा स्थितीत उभी केल्याचा आरोप आहे की, त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा व धोका निर्माण झाला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आशिष मारुती रहाटे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी पहाटे १.२५ वाजण्याच्या सुमारास घडली.
लांजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच स्पेश वसंत तरळ (वय ४३, व्यवसाय : ड्रायव्हिंग, रा. साटवली, ता. लांजा) याच्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप (एमएच-०८-एपी-३७५५) मुंबई-गोवा महामार्गावर भूमिअभिलेख कार्यालयासमोर अशा स्थितीत उभी करण्यात आली होती की, ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच इतर वाहनांना धोका आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूरज मौला नाईकवाडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राजू अरमोहम्मद शाह (वय ४७, सध्या रा. पावस रोड, गोपाळपुलाजवळ, गोळप, ता. रत्नागिरी; मूळ रा. गोंडा, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने त्याच्या ताब्यातील एमएच-०८-एजे-३२२१ क्रमांकाची मोटारसायकल पावस येथील पोस्ट ऑफिससमोरील गाडीअड्डा ते पावस बाजारपेठेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने उभी केली होती की, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी पोलीस शिपाई कुणाल अविनाश चव्हाण यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव जाणाऱ्या महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरही कारवाई करण्यात आली. अमोल बाळकृष्ण सागवेकर (वय ४६, रा. सोनारवाडी, हातखंबा) याने त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट (एमएच-०८-बीई-९४१९) अशा पद्धतीने उभी केल्याचा आरोप आहे की, त्यामुळे इतर वाहनचालकांना वाहन चालवताना धोका निर्माण होऊन वाहतुकीस अडथळा होत होता. या प्रकरणी पोहेकॉ. गणपत जान झोरे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजता घडल्याचे पोलिस नोंदीत आहे.
‘रस्ते वाहनांसाठी, पार्किंगसाठी नव्हेत!’
दरम्यान, महामार्ग, सर्व्हिस रोड आणि प्रमुख रस्त्यांवर बेदरकारपणे वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढतो. विशेषतः अरुंद सर्व्हिस रोडवर अवजड वाहने किंवा चारचाकी उभी राहिल्यास इतर वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा किंवा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली कारवाई महत्त्वाची ठरत आहे. रस्ता हा वाहतुकीसाठी आहे; मनमानी पार्किंगसाठी नव्हे, असा संदेश या कारवायांमधून वाहनचालकांना देण्यात आला आहे.
लांजात मद्यधुंद अवस्थेत आढळला
लांजा पोलिसांनी संजय बाजीराव पतयाने (वय ४५, रा. पुनस-कोड, ता. लांजा) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ अंतर्गत कारवाई केली आहे. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४२ वाजण्याच्या सुमारास पुनस-कोड येथे तो दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका अशोक कांबळे यांनी फिर्याद दिली. गुन्हा क्र. १७५/२०२६ दाखल करण्यात आला असून, जप्त मालमत्ता निरंक असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

