(गुहागर / वार्ताहर)
कोकणातील लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ‘बहुरंगी नमन’ ही पारंपरिक लोककला आजही गुहागर तालुक्यातील उमराठ गावात तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने जपली जात आहे. आधुनिक मनोरंजनाच्या साधनांच्या वाढत्या प्रभावातही ‘आई नवलाई नमन मंडळ, उमराठ’ या मंडळाने पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही सांस्कृतिक परंपरा अखंडपणे जिवंत ठेवली आहे.
कोकणात दशावतार, बहुरंगी नमन (कोकणचे खेळे), जाखडी नृत्य, कलगीतुरा, तमाशा, भारूड आणि भजन अशा विविध लोककलांची समृद्ध परंपरा आहे. यापैकी दशावतार ही लोककला प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असून, बहुरंगी नमन ही रत्नागिरी जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख मानली जाते. या लोककलेच्या माध्यमातून गावातील सर्व समाजघटक एकत्र येऊन सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य करतात.
शिमगोत्सवाची चाहूल लागताच उमराठ गावात नमनाच्या तयारीला सुरुवात होते. नमनाचा प्रारंभ करण्यापूर्वी गावकरी गादीवर एकत्र येऊन खेळाचे पोशाख परिधान करतात. या विधीला ‘साज चढवणे’ असे म्हटले जाते. त्यानंतर मृदंगाच्या तालावर संकासूर, कोळीण (ग्रामदेवतेचे प्रतीक), थेर, स्थवन करणारे कलाकार आणि धरकरी एकत्र येऊन पारंपरिक नृत्य सादर करतात. लाकडी मुखवट्यांच्या साहाय्याने सादर होणारे हे नृत्य ‘आई नवलाई नमन मंडळा’चे खास वैशिष्ट्य मानले जाते.
या मंडळात बाळकृष्ण घाडे, राजाराम घाडे, चंद्रकांत घाडे, अनिल गोरिवले, भिकू मालप, लक्ष्मण गावणंग, गंगाराम गावणंग, गणपत गावणंग, रमेश गावणंग, काशिराम गावणंग, शांताराम विठ्ठल गावणंग, शांताराम रूपाजी गावणंग, नारायण गावणंग, भागोजी गावणंग, पुणाजी गावणंग, गंगाराम माईना आणि सुरेश महादेव गावणंग हे प्रमुख कलाकार कार्यरत आहेत. हे सर्व कलाकार नव्या पिढीतील तरुणांना या लोककलेचे प्रशिक्षण देऊन परंपरा पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.
शिमगोत्सवादरम्यान गावातील देवखेळे भिक्षुकीसाठी गावाची सीमा ओलांडून इतर गावांत जोगवा मागतात. त्यातून मिळालेल्या शिदोरीचा गावाच्या हद्दीत नैवेद्य दाखविण्याची परंपरा आजही कायम आहे. तसेच गावातील प्रत्येक वाडीतील सार्वजनिक पूजेनिमित्त मुंबई मंडळासह ‘आई नवलाई नमन मंडळा’चे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये गण-गवळण, प्रबोधनपर विनोदी फार्स तसेच पौराणिक आणि ऐतिहासिक वगनाट्यांचा समावेश असतो.
मार्गशीर्ष महिन्यातील देवदिवाळी तसेच विविध गावांच्या उत्सवांमध्येही या मंडळाचे कार्यक्रम सादर केले जातात. गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर ‘साज उतरवण्याचा’ विधी पार पडतो आणि त्यानंतर पुढील शिमगोत्सवापर्यंत नमनाच्या सादरीकरणाला विराम दिला जातो.
उमराठ येथील ‘आई नवलाई नमन मंडळ’ केवळ एक सांस्कृतिक संस्था नसून, कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा जपणारे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे.

