(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, मधुमेह (डायबेटीस), हायपर टेंशन तज्ञ सेवा तसेच अत्याधुनिक मेडिसिन आणि सर्जरी विभागाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद सदस्या सौ. माधवी गिते यांच्या हस्ते फीत कापून या नवीन विभागांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना माधवी गिते यांनी खातू परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. हृदयविकार किंवा इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना रत्नागिरी, मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र आता संगमेश्वरमध्येच तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून दर्जेदार उपचार उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. प्रसाद खातू यांनी सुश्रुषा हॉस्पिटलच्या प्रवासाचा आढावा घेत ग्रामीण भागातील जनतेला सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
नवनियुक्त तज्ञ डॉ. चंद्रमणी दिडगांवकर (MD Medicine, MBBS) यांनी आपल्या मनोगतातून हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार देण्याची ग्वाही दिली. ग्रामीण भागातील रुग्णांना आपत्कालीन सेवांसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल शेठ भिडे यांनीही खातू परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करत सुश्रुषा हॉस्पिटलने नेहमीच ग्रामीण भागातील रुग्णांच्या गरजा ओळखून सेवा दिल्याचे सांगितले. आता तज्ञ सेवा रोज उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लायन्स क्लबचे अध्यक्ष रविकांत शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत करत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरणार असल्याचे सांगितले. वेळेत उपचार उपलब्ध झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील, असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यास राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या माधवी गिते, नावडीचे उपसरपंच विवेक शेरे, कसबा सरपंच पूजा लाणे, कोंड असुर्डेच्या सरपंच सोनल शिंदे, एलएलपी मेडिकेअर रत्नागिरीचे संचालक व जनता स्टोअरचे मालक नितीन शेठ खातू, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर भिंगार्डे, प्रमोद भिंगार्डे, प्रमोद शेट्ये, डॉ. सादिक मुकादम, विनय मुरकर, ग्रामपंचायत सदस्य शिंदे तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष रविकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुश्रुषा हॉस्पिटलचे आधारस्तंभ डॉ. प्रदीप खातू, डॉ. प्रीती खातू, डॉ. प्रसाद खातू आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनेत्रा खातू यांच्या कार्याचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील जनतेला उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रसाद खातू यांनी उपस्थितांचे आभार मानत, भविष्यातही सुश्रुषा हॉस्पिटल अधिक सक्षमपणे लोकसेवेसाठी कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली. नव्या सुविधांमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

