(संगमेश्वर / एजाज पटेल)
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर थंड पेये, आईस्क्रीम, सरबत आणि आईसगोळ्यांचा आधार घेत आहेत. मात्र शहरासह ग्रामीण भागात रस्त्यांवर विक्री होणाऱ्या या पदार्थांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावरील थंड पेये, लिंबू सरबत तसेच विविध रंगांचे बर्फाचे गोळे खाताना दिसतात. मात्र या पदार्थांमध्ये वापरला जाणारा बर्फ खाण्यायोग्य आहे की नाही याची खात्री नसते. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर विक्री होणारे सरबत आणि बर्फाचे गोळे खाणे टाळणे गरजेचे आहे.
अनेकदा कोल्ड स्टोरेजसाठी वापरला जाणारा कच्चा बर्फ स्वस्त दरात खाण्यासाठी विकला जात असल्याचे आढळून येते. हा बर्फ थेट सेवनासाठी योग्य नसल्याने त्यातून संसर्गजन्य तसेच गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावोगावी चौकाचौकांत, बाजारपेठांमध्ये तसेच हातगाड्यांवर रंगीबेरंगी आईसगोळे, आईस्क्रीम आणि विविध प्रकारची थंड पेये मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवलेली दिसतात. याशिवाय बर्फाचे गोळे तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नाही, अशीही तक्रार आहे. अनेक विक्रेते हातात ग्लोज न घालता अस्वच्छ परिस्थितीत गोळे तयार करताना दिसतात. त्यामुळे अशा गोळ्यांचे सेवन केल्यास पोटाचे विकार, उलट्या-जुलाब यांसारख्या तक्रारी उद्भवण्याचा धोका वाढतो.
या पदार्थांच्या निर्मितीसाठी कोणत्या दर्जाचे पाणी वापरले जाते, स्वच्छतेचे नियम पाळले जातात का किंवा त्यामध्ये वापरले जाणारे रंग व रसायने सुरक्षित आहेत का, याची कोणतीही खातरजमा होताना दिसत नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे व दूषित पाण्यापासून तयार होणारे पदार्थ थेट नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत.
विशेषतः लहान मुलांमध्ये रंगीबेरंगी आईसगोळे आणि सरबत यांचे मोठे आकर्षण असते. मात्र या पदार्थांमध्ये वापरले जाणारे कृत्रिम रंग, स्वस्त दर्जाचे फ्लेवर्स आणि अशुद्ध पाणी यामुळे पोटाचे विकार, उलट्या-जुलाब, घशाचे आजार, सर्दी-खोकला तसेच श्वसनासंबंधी तक्रारी वाढण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अचानक बर्फ खाल्ल्यामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. तसेच बर्फाच्या गोळ्यावर टाकल्या जाणाऱ्या जेली, सिरप आणि विविध रंगांच्या पेयांमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. या रंगांचे उत्पादन कधी झाले किंवा ते सुरक्षित आहेत की नाहीत, याची माहिती ग्राहकांना नसते. काही ठिकाणी अशा पदार्थांचे सेवन केल्यानंतर नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी वाढल्याची उदाहरणेही समोर येत आहेत.
तरीही अनेक विक्रेते कोणतेही परवाने किंवा आरोग्यविषयक नियम न पाळता खुलेआम थंड पदार्थांची विक्री करत आहेत. स्वच्छतेचा पूर्ण अभाव, उघड्यावर ठेवलेले बर्फ, अस्वच्छ भांडी आणि संशयास्पद रंगांचा वापर अशा प्रकारचे प्रकार सर्रास दिसून येतात. मात्र संबंधित विभागांकडून या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने नियमित तपासण्या, नमुने चाचणी आणि परवाना पडताळणीसारख्या कारवाया करणे आवश्यक असताना त्या अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने बोगस उत्पादक आणि विक्रेत्यांचे फावले असल्याची टीका केली जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यावर विक्री होणाऱ्या थंड पेये, आईसगोळे आणि आईस्क्रीमचे नमुने तपासणे, स्वच्छतेचे निकष तपासणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच उन्हाळ्यात थंड पदार्थांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी त्यामागील आरोग्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

